व्याळा : जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदिग्ध रुग्ण व कोरोनाबाधित रुग्णांसाठी बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथे ग्रा.पं. प्रशासनाच्या वतीने कोविड-१९ विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे.
बाळापूर तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनामार्फत उभारण्यात आलेले पहिले कोविड-१९ विलगीकरण कक्ष असून, या उपक्रमाचे कौतुक होत आहे. विलगीकरण कक्षामध्ये उपचारासाठी राहत असलेल्या रुग्णांना चहा, बिस्किटे व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गावात विलगीकरण कक्ष माजी पंचायत समिती सभापती पंढरीनाथ हाडोळे, सुनील नावकार, नीलेश हाडोळे, ग्रामसेवक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच शीतल गणेश वाडेकर, उपसरपंच संदीप घाटोळ, ज्ञानेश्वर महाराज जावरकार, नंदाताई साबळे, रफीक, रवी तेलगोटे, दत्ता फुरंगे, संतोष सरफ, कैलास पवार यांनी उभारले आहे. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रभान घाडगे, राहुल तेलगोटे, उखळा धनोकार, प्रवीण कलोरे, कडुराम तेलगोटे, सलीम आदी परिश्रम घेत आहेत.