सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था बळकावण्यात केवळ एक घोळ नसून यामध्ये घोळाची मालिकाच असल्याची माहिती समोर आली आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर सहायक धर्मादाय आयुक्त व पोलिसांनी या प्रकरणाची जोरात चौकशी सुरू केली आहे.आदर्श कॉलनीतील रहिवासी दामोदर कोंडाजी इंगळे यांनी त्यांच्या १५ सहकार्यांसह १९९0 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान ही संस्था अकोल्यात सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत केली होती; मात्र त्यानंतर ही संस्था सोलापूर, सांगली व मुंबई येथील रहिवासी असलेल्या १५ जणांनी अकोल्यातील सभासदांच्या बनावट स्वाक्षरी करून परस्पर ‘चेंज रिपोर्ट’ अकोला धर्मादाय आयुक्तांकडे सादर करून बळकावली. सदर संस्थेचे सोलापूर येथे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सहायक धर्मादाय आयुक्तांनी या संस्थेच्या गांधी नगर व्हीएचबी कॉलनी येथील कार्यालयात नोटीस पाठविल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या गंभीर प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच खळबळ माजली. सहायक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी करण्यास सुरुवात केली असता यामध्ये प्रचंड घोळ असल्याचे उघड झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
संस्था बळकावण्यासाठी केलेले घोळ- या संस्थेचे सभासद कैलास सरकाटे यांचे २00१ मध्येच निधन झाले. त्यांच्या चेंज रिपोर्टवर स्वाक्षरी आहेत. यासह बैठकीसाठी उपस्थित असल्याच्याही स्वाक्षरी असल्याने हा चेंज रिपोर्ट बनावट स्वाक्षरीद्वारेच दाखल केल्याचा तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. २0 एप्रिल २00७ रोजी झालेल्या बैठकीतही सरकाटे यांची स्वाक्षरी करून त्यांना उपस्थित दाखविले.- सदर संस्थेचा ‘चेंज रिपोर्ट’ २00७ मध्ये दाखल करण्यात आला, तर २0१३ मध्ये तो मंजूर झाला; मात्र सोलापूर, मुंबई व सांगली येथील संचालक मंडळाने २00१ पासूनचे ऑडिट रिपोर्ट सादर केले आहे. हा ऑडिट रिपोर्ट कसा काय तयार झाला, हा मोठा घोळ आहे.- अमरावती सह धर्मादाय आयुक्तांनी सोलापूर, मुंबई व सांगली येथील संचालक मंडळाला उपस्थित राहण्याची नोटीस दिली; मात्र संचालक मंडळातील एकही सभासद उपस्थित राहिला नाही. १५ पैकी पाच संचालकांना नोटीस मिळाल्याची पोचपावती संबंधितांकडे उपलब्ध आहे. - चेंज रिपोर्ट व बैठकीसाठी उपस्थित सभासदांच्या स्वाक्षरीची पाहणी केली असता यामध्ये बहुतांश शब्द एकाच व्यक्तीने लिहिल्याचे स्पष्ट दिसून येते. र व अन्य काही शब्द एकसारखेच आहेत. एवढेच नव्हे, तर मृतक व्यक्तीही बैठकीला उपस्थित दाखविण्यात आला.- संस्थेचे कार्यालय असलेले दामोदर इंगळे यांच्या निवासस्थानी ११ जून २0१७ ला बैठक बोलावण्याची २५ मे २0१७ रोजी नोटीस काढण्यात आली. या नोटीसमध्ये बैठकीचे ठिकाण संस्थेचे कार्यालय दामोदर इंगळे यांचे व्हीएचबी कॉलनीतील निवासस्थान दाखविण्यात आले; मात्र सदरची बैठक रघुशेठवाडी घाटला चेंबुर येथे घेतल्याचे दाखविण्यात आले, यावरून मोठा संशय निर्माण होतो.- या संस्थेचे कार्यालय अकोल्यातील व्हीएचबी कॉलनीत असताना मुख्य कार्यालय नागपुरातील जयताळा येथे दाखविण्यात आले, तर एका बैठकीसाठी चेंबुरमध्येही कार्यालय दाखविले. एकाच संस्थेचे तीन ठिकाणी मुख्य कार्यालय दाखविण्यात आले.- नागपुरातील जयताळा येथे २३ ऑक्टोबर २00७ रोजी झालेल्या बैठकीत व निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक तुकाराम इंगळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी दाखविण्यात आले; मात्र त्याच दिवशी व तारखेला अशोक इंगळे हे त्यांच्या शाळेवर उपस्थित असल्याचा अहवाल त्यांच्या मुख्याध्यापकांनी दिला आहे.