विवेक चांदूरकर/ अकोला : जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंंत पावसाने दडी दिल्यामुळे कपाशीची वाढ खुंटली. आता गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे कपाशीवर आकस्मिक मर रोग आला असतानाच, आता या पिकावर शेंडी पोखरणार्या अळीनेही हल्ला केला आहे. ही अळी खोडाच्या आतमध्ये असल्यामुळे विषारी औषधांच्या फवारणीमुळे ती नियंत्रणात येत नसून, परिणामी उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता आहे. वर्हाडात कपाशी हे प्रमुख पीक असून, लाखो हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. ओलिताची व्यवस्था असलेल्या अनेक शेतकर्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी केली; मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच कपाशी पिकाला विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. तब्बल दीड महिना पाऊस नसल्यामुळे कपाशीची वाढ खुंटली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असताना, कपाशीवर आकस्मिक मर रोग आला. त्यानंतर आता शेंडी पोखरणार्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही अळी कपाशीच्या वरच्या भागातून खोडामध्ये प्रवेश करते. अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर कपाशीच्या झाडाचा शेंडा गळून एका बाजूला झुकतो. त्यानंतर अळी खोड पोखरून बुडापर्यंत जाते. संपूर्ण खोड पोखरल्यामुळे झाडाच्या फांद्या व पानांना आवश्यक प्रमाणात मूलद्रव्ये मिळत नाहीत. परिणामी झाडांची वाढ होत नाही व बोंड धरीत नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट येते. ही अळी खोडात शिरल्यावर कपाशीवर विषारी औषधांची फवारणी केली तरी उपयोग होत नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसावे लागते.
*अळीसह शेंडा तोडणे हाच उपाय
शेंडा पोखरणारी अळी खोडात शिरल्यावर नियंत्रणात येत नाही. या अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडाचा शेंडा गळून एकीकडे झुकतो. त्यामुळे शेतकर्यांनी तत्काळ शेतात पाहणी करून या अळीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांचा अळीसह शेंडा तोडणे हाच एकमेव उपाय आहे.