अकोला : ठाण्याचे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाण्यात १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ पर्यंत पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मनमानी कारभार करीत गुन्हेगारांना पाठबळ देऊन हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप पोलीस अधिकारी भीमराज ऊर्फ भीमराव घाडगे यांनी केला आहे. तसे पत्रच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि एसीबीला दिले आहे.
परमबीर सिंग हे दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक झोनच्या डीसीपीकडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याचे बिस्कीट, सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडून प्रत्येकी २० ते ३० तोळ्यांचे सोन्याचे बिस्कीट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून सुमारे ३० ते ४० तोळ्यांची सोन्याची बिस्किटे घेतली आहेत, असा गाैप्यस्फाेट घाडगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता एजंट राजू अय्यर यास ठेवले होते. तसेच पोलीस उपआयुक्त पराग मणेरे यांचाही त्यात सहभाग होता, असेही घाडगे यांनी म्हटले आहे.
‘श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी दबाव’
भीमराव घाडगे हे कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. अनेक श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता. तसे न केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे घाडगे यांचे म्हणणे आहे. सध्या ते अकोला नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.