लोकमत इफेक्ट
नासीर शेख
खेट्री : पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे पशुपर्यवेक्षकास संतप्त झालेल्या पशुपालकांनी धारेवर धरल्याचा प्रकार बुधवार रोजीच्या सकाळी उघडकीस आला. पिंपळखुटा येथे गेल्या काही दिवसांपासून शेळ्या दगावण्याचे सत्र सुरूच आहे. पिंपळखुटा येथे गेल्या काही दिवसांपासून शेळ्यांवर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने गंभीर शेळ्यांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १५ सप्टेंबर रोजीच्या अंकात प्रकाशित करताच संबंधित पशू विभाग खडबडून जागा झाला. वृत्त प्रकाशित केल्याच्या दिवशी बुधवारी पशुपर्यवेक्षक उपचार केंद्रात हजर होऊन गंभीर शेळ्यांवर उपचार करण्यास सुरुवात केली.
बुधवारीही भिकण शाह यांच्या शेळीवर उपचार करताच शेळी दगावली. त्यामुळे काही संतप्त झालेल्या पशुपालकांनी पशुपर्यवेक्षकांना चक्क धारेवर धरले. पशूंना वेळेवर उपचार मिळत नसल्याने गेल्या पाच दिवसांत १२ पिलांसह ३ शेळ्यांचा अज्ञात आजारामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १५ शेळ्या गंभीर आहे. याकडे संबंधित पशू विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेळ्या दगावण्याचे सत्र सुरूच आहे. संबंधित वरिष्ठांनी वेळीच दखल घेऊन शेळ्यांवर उपचार करावा, अन्यथा शेकडो शेळ्या दगावण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृत्ताची दखल घेत पशुपर्यवेक्षकांनी पशू उपचार केंद्र गाठले. शेळ्यांवर उपचार करण्यास सुरुवात केली, परंतु सुरुवातीपासून गंभीर झालेल्या शेळ्यांवर उपचार करण्यास टाळटाळ केल्यामुळे शेळ्या दगावण्याचे सत्र सुरूच आहे.
----------------------
150921\screenshot_2021-09-15-16-12-03-24_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7.jpg
फोटो