अकोला : अत्यंत घातक कीटकजन्य आजारांपैकी एक असलेल्या डेंग्यूला अटकाव करण्यासाठीची प्रतिबंधात्मक लस भारतात कितपत उपयुक्त ठरेल, याची खातरजमा करून घेण्यासाठी देशभरात विविध वयोगटातीललोकांचे ‘सेरो’ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) ची चार सदस्यीय चमू अकोल्यात दाखल झाली असून, सदर चमूने मंगळवार, २४ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील दोन शहरी व दोन ग्रामीण अशा चार ठिकाणच्या लोकांचे रक्तजल नमुणे घेण्यास सुरुवात केली आहे.विदेशात डेंग्यूला प्रतिबंध म्हणून लस तयार करण्यात आली असून, आता अशीच प्रतिबंधात्मक लस भारतातही तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी करण्याकरिता विविध वयोगटातील डेंग्यू रुग्णांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद, दिल्ली व राष्ट्रीय साथरोग संस्था (एनआयई), चेन्नई या दोन संस्था संपूर्ण भारतात विविध वयोगटातील डेंग्यूची लागण झालेले तसेच डेंग्यू संशयित रुग्णांचे ‘सेरो’ सर्वेक्षण करणार आहे. महाराष्ट्रातील अकोला, औरंगाबाद, पुणे व उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही), पुणे या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार एनआयव्हीचे शास्त्रज्ञ डॉ. प्रविण देशमुख यांच्या नेतृत्वात राहुल जगताप, कैलाश गाडेकर, मच्छिंद्र करंजाऊंदे ही चार सदस्यीय चमू अकोल्यात सोमवारी दाखल झाली. त्यांच्यासोबत हिवताप विभागाचे जिल्हास्तरीय पर्यवेक्षक एस. एम. भामुद्रे असून, मंगळवारी या चमूने बार्शीटाकळी तालुक्यातील घोटा या गावात सर्वेक्षण करून जवळपास ४३ लोकांचे रक्तजल नमुणे घेतले. बुधवारी सदर चमूने मुर्तीजापूर तालुक्यातील कवठा-कोल्हापूर या गावातील ग्रामस्थांचे रक्तजल नमुणे घेतले. या कामात स्थानिक पातळीवरील आरोग्य सेवक, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभत आहे. गुरुवारी ही चमू पातूर शहरातील वार्ड क्र. १३ व त्यानंतर शुक्रवारी आकोट शहरातील वार्ड क्र. १५ मधील नागरिकांचे रक्तजल नमुणे घेणार आहे. सदर रक्तजल नमुने पुढील अभ्यासाकरिता एनआयव्ही, पुणे येथे पाठविणार आहेत. या ठिकाणी गोळा झालेल्या नमुन्यांचा अभ्यास केल्यानंतर भारतासाठी उपयुक्त अशी डेंग्यूची लस विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
असे केले जाते सर्वेक्षणसदर चमू निश्चित केलेल्या गावांमध्ये जाऊन विविध वयोगटातील १०० नागरिकांच्या नावांचा गट तयार करून ती यादी इंटरनेटद्वारे चेन्नई येथील राष्ट्रीय साथरोग संस्था (एनआयई)कडे पाठविते. ‘एनआयई’मध्ये या यादीतील माहितीचे विश्लेषण करून कोणाचे रक्तजल नमुणे घ्यायचे आहेत, ते गावामध्ये कार्यरत असलेल्या चमूला कळविले जाते. एनआयईकडून आलेल्या यादीप्रमाणे सदर चमू घरोघरी जाऊन त्या-त्या व्यक्तींचे रक्तजल नमुणे घेत आहे. साधारणपणे एका गावातील सर्वेक्षणासाठी दिवसभराचा कालावधी लागत असल्याचे जिल्हास्तरीय पर्यवेक्षक एस. एम. भामुद्रे यांनी सांगितले.