अकोला : नकळत किती लोकांना कोरोनाची लागण झाली, याची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यात अॅन्टीबॉडीज चाचणी म्हणजेच ‘सेरो’ सर्वेक्षणाची तयारी केली जात आहे. या अंतर्गत २,८०० लोकांची चाचणी केली जाणार आहे; मात्र त्यासाठी आवश्यक किट उपलब्ध नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी आरोग्य यंत्रणेची आॅनलाइन बैठक झाली. बैठकीत ‘सिरॉलॉजिकल’ सर्वेक्षणाच्या नियोजनाचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. त्यानुसार, १ लाख लोकसंख्येमागे १०० व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या शंभर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहे. ज्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली नाही, अशा व्यक्तींच्याच रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहे. या चाचण्यांमधून संबंधित व्यक्तींच्या शरीरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेमार्फत नियोजनही केले जात आहे; मात्र अद्यापही त्यासाठी आवश्यक किट उपलब्ध न झाल्याने सर्वेक्षणाला विलंब होण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणाची तयारी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे किटची मागणी केली आहे. किट मिळताच सर्वेक्षणाला सुरुवात केली जाईल.- डॉ. मीनाक्षी गजभिये,अधिष्ठाता, जीएमसी, अकोला