अकोला, दि. १४ : चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेची निवडणूक ध्यानात घेता, मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या भागातील राजकीय परिस्थिती तपासण्यासाठी काही पक्षांनी सर्व्हे सुरू केला आहे. मलकापूर, शिवणी, शिवर, खडकी, मोठी उमरी व गुडधी परिसरात इतर राजकीय पक्षांचा प्रभाव पाहता सर्व्हेसाठी भाजप, शिवसेनेसह काँग्रेसची चमू कामाला लागल्याची माहिती आहे. राज्य शासनाने एक सदस्यीय प्रभाग पद्धत बंद करून बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केल्याचा परिणाम राजकीय समीकरणांवर होईल, हे निश्चित आहे. त्यात महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन शहरालगतच्या २४ गावांचा मनपात समावेश झाल्यामुळे राजकीय पक्षांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. मनपा प्रशासनाने २४ गावांतील लोकसंख्या लक्षात घेऊन प्रभाग पुनर्रचना केली. एका प्रभागात किमान २४ हजार ते जास्तीत जास्त २९ हजार ५४३ लोकसंख्येचा समावेश करण्यात आला. त्यानुसार २0 प्रभागांची निर्मिती केली असून, ८0 नगरसेवकांची संख्या तूर्तास निश्चित मानल्या जात आहे. प्रभागाची वाढलेली लोकसंख्या तसेच क्षेत्रफळात झालेली वाढ पाहता, ही निवडणूक राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. मनपासह राज्य व केंद्रात भाजपची सत्ता आहे. यामध्ये मित्रपक्ष शिवसेनेचीही साथ आहे. या दोन्ही ठिकाणी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरालगतच्या मलकापूर, मोठी उमरी, गुडधी, शिवणी व शिवर आदी परिसरात भारिप बहुजन महासंघाची मजबूत पकड आहे. प्रभागांची व नगरसेवकांची वाढलेली संख्या पाहता या भागातील राजकारणामुळे निवडणुकीला कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विचारातून भाजप, शिवसेनेसह काँग्रेसने कार्यकर्त्यांचा सर्व्हे सुरू केल्याची माहिती आहे. इच्छुकांची उडाली झोप! प्रभाग पुनर्रचनेनुसार एका प्रभागाची लोकसंख्या किमान २४ हजार ते २९ हजार ५४३ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. लोकसंख्या व प्रभागाचे वाढलेले क्षेत्रफळ पाहता पूर्वीच्या द्विसदस्यीय प्रभागांपेक्षा तीनपट प्रभाग वाढल्याचे दिसून येते. निवडणुकीत प्रचारादरम्यान मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे, या विचाराने इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. अनेक प्रभागांत खिचडी? मनपातील दिग्गज नगरसेवक एकाच प्रभागात येण्याची दाट शक्यता असल्याने निवडणुकीच्या आखाड्यात रंगत चढणार आहे. यातील अनेक ठिकाणी खिचडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिशेने माहिती जमा करण्याचे काम पक्षातील कार्यकर्त्यांकडून सुरू झाले आहे.
हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात राजकीय पक्षांकडून सर्व्हे
By admin | Published: September 15, 2016 3:07 AM