लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: शासनाने पीक विमा काढण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंतच वाढविली आहे; परंतु ऑनलाइन विमा काढण्यासाठी कंपनीची साइट ओपन होत नाही व बँकांना शासननिर्णयानुसार बिगर कर्जदार शेतकर्यांचा पीक विमा न काढण्याबाबत सूचना असल्यामुळे शेतकर्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तरी बँकांनी ४ ऑगस्ट रोजी बँकेत येणार्या सर्व शेतकर्यांचा पीक विमा स्वीकारावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्यांकडून केली जात आहे. ऑनलाइन साइट ओपन होत नाही व बिगर कर्जदार शेतकर्यांचा पीक विमा काढू नये, असे निर्देश बँकांना शासनाकडून देण्यात आले आले आहेत. अशा परिस्थितीत पीक विमा कोठे काढावा, याबाबत चौकशी करण्यासाठी गाडेमोड कुपटा येथील अँड. बाळकृष्ण भाजीपाले, बाजार समितीचे संचालक राजेश नळकांडे यांनी तहसीलदार दीपक पुंडे, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. त्यामुळे या अधिकार्यांनी संबंधित सर्व बँक अधिकार्यांशी संपर्क साधून चर्चा केली. तेव्हा संबंधित बँक अधिकार्यांनी ते शासन निर्णयानुसार ४ ऑगस्टपर्यंत कर्जदार शेतकर्याचा पीक विमा काढू शकतात. बिगर कर्जदार शेतकर्यांना पीक विमा काढण्यासाठी ई-महा-सेवा केंद्रातून ऑनलाइन पीक विमा काढावा लागेल, असे सांगितले; परंतु पीक विमा ऑनलाइन काढण्यासाठी आवश्यक असलेली साइट ओपन होत नसल्यामुळे शेतकर्यांची चांगलीच कोंडी होत आहे.
तांत्रिक अडचणींनी शेतकरी त्रस्तबोरगाव मंजू : पंतप्रधान विमा योजनेचे अर्ज भरताना सर्व्हर डाउन होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गुरुवारी अनेक शेतकर्यांना फॉर्मच भरता न आल्याने परिसरातील ३0 गावांतील शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीक विमा योजना काढताना अनेक अडचणी येत असल्याने शासनाने मुदत वाढविली आहे; मात्र तरीही ऑनलाइन अर्ज दाखल करताना शेतकर्यांना अनेक अडचणी येत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करून बोरगाव मंजू येथील केंद्रावर गर्दी करीत आहेत.