अकोला : अकोल्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले नटवरलाल चौधरी यांचे व्यक्तिमत्त्व देववादी नसून, ध्येयवादी आहे. त्यामुळेच ते खरे कर्मयोगी असल्याचे मत प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके यांनी सेवाश्री पुरस्कार वितरण कार्यक्रमात रविवारी व्यक्त केले. विदर्भकेसरी ब्रजलाल बियाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणार्या सेवाश्री पुरस्काराचे वितरण १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३0 वाजता खंडेलवाल भवन येथे करण्या त आले. मागील १८ वर्षांंपासून क्विक अँड या जाहिरात संस्थेच्यावतीने सेवाश्री पुरस्काराचे वितरण केले जात आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार यमाजी मालकर, सेवाश्री पुरस्काराचे संयोजक सत्यनारायण रांदड उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नटवरलाल चौधरी यांना १९ वा सेवाश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. श्रीकांत तिडके म्हणाले की, महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झालेले नटवरलाल चौधरी यांना स्वराज्य नव्हे तर सुराज्य हवे होते. त्यामुळे त्यांनी समाजकार्य सुरू केल्यानंतर जेथे पावले टाकले तेथे त्यांच्या पाऊलखुणा उमटल्या.सध्या वृद्धांची होत असलेली उपेक्षा पाहून वृद्धाश्रमांची नितांत गरज वाटत असल्याची खंतही तिडके यांनी बोलून दाखविली. वृद्धाश्रम हे सरकारी अनुदानावर चालू नये तर सुजाण लोकांनी त्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला हवे, असे मत डॉ. श्रीकांत तिडके यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना चौधरी यांनी समाजसेवी संस्थांनी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
नटवरलाल चौधरी यांना सेवाश्री पुरस्कार प्रदान
By admin | Published: September 15, 2014 1:48 AM