आगामी नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईपासून ते आबालवृध्दांपर्यंत तयारीला लागले आहेत. महिलांच्या उत्साहाचा पारंपरिक सण अशी ओळख असलेल्या मकरसंक्रांतीच्या अनुषंगाने बाजारपेठेत आतापासूनच उलाढाली सुरू झाल्या आहेत. हिवाळ्यात आराेग्यासाठी पाैष्टिक असलेल्या तीळ, गूळ व काजू-बादामचे लाडू खाण्याच्या प्रमाणात वाढ हाेते. यातही सर्वसामान्यांना तीळ-गूळ व शेंगदाण्याचे लाडू परवडणारे असल्याने किराणा दुकानांमध्ये अशा खाद्यपदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. यंदा काेराेनाच्या सावटाखालीच सर्व सण, उत्सव साजरे करण्यात आले. त्यामध्ये दिवाळीचाही समावेश हाेता. दिवाळीपूर्वी तीळ, गूळ यांचे दर कमी हाेते. मकरसंक्रांतीची चाहूल लागताच तीळ व गुळाच्या दरांत वाढ झाली असून अपवाद साखरेच्या दरात अल्प घसरण झाल्याचे दिसत आहे.
तिळाचे भाव वाढले!
दिवाळीपूर्वी तिळाचे दर १२५ रुपये प्रति किलाे हाेते. हिवाळ्यात खरेदीसाठी नागरिकांचा वाढलेला कल व जानेवारी महिन्यातील मकरसंक्रांत लक्षात घेता त्यामध्ये प्रति किलाे १० ते १५ रुपयांनी वाढ झाली असून, किरकाेळ दुकानांमध्ये तीळ १४० रुपये किलाेप्रमाणे विक्री केला जात आहे.
सेंद्रिय गुळाचा गाेडवा वाढला!
मागील काही दिवसांत गुळाच्या दरातही ५ ते १० रुपयांनी वाढ झाली असून ४० रुपयांपासून ते ५५, ९० ते १०० रुपयांपर्यंय त गुळाची प्रति किलाेप्रमाणे विक्री केली जात आहे. काही दिवसांपासून सेंद्रिय गुळाची मागणी वाढली असून ९० ते १०० रुपये प्रति किलाेनुसार सेंद्रिय गुळाची विक्री हाेत आहे. अनेक सुशिक्षित तरुण कास्तकार या व्यवसायाकडे वळल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
साखरेच्या दरात किंचित घसरण
आराेग्यासाठी साखरेपेक्षा गूळ पाैष्टिक मानला जाताे. याचा परिणाम म्हणून की काय, साखरेच्या दरात किंचित घसरण झाली आहे. दाेन महिन्यांपूर्वी साखर ३८-३९ रुपये किलाे हाेती. आजराेजी साखरेचा भाव ३६ रुपये किलाे झाला आहे.
काेराेनाचे संकट असले तरीही मकरसंक्रांतीचा उत्साह आहे. तीळ, गुळाचे दर वाढले असून याचा परिणाम गृहखर्चावर झाला आहे.
-मीनाक्षी पाटील, गृहिणी
काेराेनाचे संकट अद्यापही कायम असल्याचा परिणाम खाद्यपदार्थांच्या भाववाढीवर झाला आहे. पुढील काही दिवसांत आणखी भाववाढ हाेण्याची चिन्ह आहेत.
- सागर जैन, किराणा व्यावसायिक