लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पुढील वर्षीच्या संच मान्यतेमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार कार्ड क्रमांकासह नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांना १६ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे शिक्षकांची विद्यार्थी पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास एकच धावपळ उडाली; परंतु आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढविली असल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. गत काही दिवसांपासून संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड क्रमांकासह माहिती भरण्याचे काम शिक्षक करीत होते. माहिती भरताना शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थी पोर्टल हे संकेतस्थळ अनेकदा बंद पडत होते किंवा संथपणे काम करीत असल्याने शिक्षकांना दिवसभरात विद्यार्थ्यांची माहिती भरताना त्रास होत होता. शेकडो शिक्षक मध्यरात्रीच्या सुमारास कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन माहिती भरण्याचे काम करीत होते आणि शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीचा कालावधीसुद्धा कमी असल्यामुळे शिक्षकांनी संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास पुरेसा कालावधी देण्याची मागणी केली होती. संच मान्यतेमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार कार्डसह माहिती न भरल्यास शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येत असल्याने जिल्हय़ातील शाळांमधील शिक्षक चांगलेच कामाला लागले. शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांंचे आधार कार्ड नसल्यामुळे शिक्षकांनाच त्यांचे आधार कार्ड काढून देण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड क्रमांकासह माहिती न भरल्यास शाळा, वर्गामधील पटसंख्या कमी दिसून येते आणि शिक्षकांना अतिरिक्त ठरावे लागते. ही वेळ आपल्यावर येऊ नये, यादृष्टीने शिक्षकच विद्यार्थ्यांंची माहिती भरण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांना येणार्या अडचणी लक्षात घेता, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांंची माहिती भरण्यास २३ ऑक्टोबरपर्यंंत मुदत वाढविल्यामुळे शिक्षकांना आता पुरेसा वेळ मिळणार आहे.
शिक्षकांना शाळांमधील विद्यार्थ्यांंची माहिती भरण्यासाठी १६ ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती; परंतु हजारो विद्यार्थ्यांंची माहिती संच मान्यतेमध्ये भरल्या गेली नव्हती. त्यासाठी शिक्षकांनीसुद्धा मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही मुदत २३ ऑक्टोबरपर्यंंत करण्यात आली आहे. यानंतर मुदत वाढविली जाणार नाही. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी.