लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरात सुरु करण्यात आलेल्या खासगी पार्किंग व्यवस्थेतील जाचक नियमांचा त्रास होत असल्याच्या कारणावरून व्यापाºयांनी २८ नोव्हेंबरपासून बंद ठेवलेली वाशिमची बाजारपेठ रविवार, १ डिसेंबरला पूर्ववत झाली. पार्किंगला १५ दिवसांची स्थगिती दिली असून, यासाठी समिती नेमली जाणार आहे.शहरातील अनियंत्रित वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणणे, पाटणी चौकातील वाहतुकीची कोंडी फोडणे आदी दृष्टिकोनातून खासगी पार्किंग व्यवस्था अंमलात आली आहे. या पार्किंग व्यवस्थेतील जाचक नियम, अरेरावीची भाषा, विविध प्रकारचा माल घेऊन येणारी वाहने संबंधित माल उतरविण्यासाठी दुकानासमोर उभी राहताच ‘जॅमर’ लावणे आदी प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप करीत याविरोधात शहरातील व्यावसायिक संघटनांनी २८ नोव्हेंबरपासून बंद पुकारला होता. कोणताही तोडगा निघाला नसल्याने १ डिसेंबरपर्यंत बाजारपेठ बंद होती. १ डिसेंबरला सायंकाळी उशिरा या पार्किंग व्यवस्थेला १५ दिवसांची स्थगिती देण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतला. पुन्हा पार्किंग व्यवस्था सुरू करण्यासाठी पार्किंग कंत्राटदार, व्यापारी मंडळ, सर्वसामान्य नागरिक यांची समिती नेमली जाणार आहे. या समितीचे प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी काम पाहणार आहेत. दरम्यान चार दिवस वाशिमची बाजारपेठ बंद राहिल्याने जवळपास २५ कोटींची उलाढाल ठप्प होती, असा दावा व्यापाºयांनी केला.
व्यापारी व पार्किंग व्यवस्थापनाच्या वादावर तोडगा; वाशिमची बाजारपेठ पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:06 PM