संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गत दोन महिन्यांमध्ये २१ अपघात झाले असून, या अपघातात १४ गंभीर अपघातांचा समावेश आहे. अपघातात ७ जणांनी जीव गमवला असून, १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच ९ जणांना किरकोळ इजा झाली आहे.
तालुक्यातील विविध भागात दोन महिन्यांच्या कालावधीत २१ अपघात झाले आहेत. यात ७ किरकोळ अपघात असून, १४ अपघात गंभीर झाले आहेत. सर्वात जास्त अपघात दर्यापूर-मूर्तिजापूर-सिरसो, कारंजा-मूर्तिजापूर-हातगाव व राष्ट्रीय महामार्गावरील खरब खरबडी-अनभोरा दरम्यान घडल्याचे चित्र आहे. अपघातांमध्ये दुचाकी अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र आहे. १ डिसेंबर रोजी आसरा रोडवर दुचाकी घसरून अनिल जोगी, एंडली हे गंभीर जखमी झाले, १९ डिसेंबर रोजी पिंजर रोडवर कंझरा-रामखेडा दरम्यान दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने सय्यद अजीम सय्यद निसार (२५) राहणार पातुर, नंदापूर हा जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. २१ डिसेंबर रोजी कंझराजवळ दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तिघे गंभीर जखमी झाले. २२ डिसेंबर रोजी स्वाती श्रीकृष्ण अनभोरे (४५) यांच्या दुचाकीस राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या घटनास्थळीच ठार झाल्याची घटना घडली होती. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत विनित गजानन गडवे (२१) (रा. हिरपूर) जखमी झाला. ३१ डिसेंबर रोजी माना येथील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ऑटोला अज्ञात वाहनाने धडक देऊन अनिल कोकणे (४८) हे जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले. ४ जानेवारी रोजी दशरथ राम सुपले यांच्या दुचाकीस खरब ढोरे रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ५ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावरील अनभोराजवळ दोन ट्रक समोरासमोर भिडल्याने ट्रकचालक गोविंद विश्राम पाल (रा.नागपूर) हे जागीच ठार झाले. ६ जानेवारी रोजी मालवाहूने दिलेल्या धडकेत शुभम जगदीश वाकोडे (२१) (रा.जामठी) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, तर त्याच दिवशी सिरसो फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धक्का दिल्याने रामकृष्ण बागराज पवार (५०) (रा.खैरी आसेगाव) हे गंभीर जखमी झाले. ८ जानेवारी रोजी सय्यद रौशन सय्यद रमजान हा पादचारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. १६ जानेवारी रोजी सेवकराम डाबेराव हा पादचारी दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाला. २३ जानेवारी रोजी सायकलने मजुरांचे डबे घेऊन जाण्यासाठी निघालेल्या आवेस खा तमिज खा (२१) या युवकास राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने चिरडले व २९ जानेवारी रोजी दुर्गवाडा येथे जाणाऱ्या उषा महादेव वानखडे या महिलेची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.
----------------------------
गतिरोधक बसविण्याची मागणी
तालुक्यात अपघात मोठ्या प्रमाणात होत असून, अनेक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची व रस्ते रुंदीकरण करण्याची मागणी निवेदनाव्दारे वेळोवेळी करण्यात आली असली तरी संबंधित प्रशासन याबाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
---------------------------------
दोन महिन्यातील चित्र
एकूण अपघात- २१
किरकोळ अपघात- ७
गंभीर अपघात-१४