अकोला: जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवकपदी नियुक्तीचे बनावट आदेशपत्र देऊन युवकाची सात लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री १0.३0 वाजता कोतवाली पोलिसांनी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहरातील अनिकट परिसरातील नेहरू नगरामध्ये राहणारे सूरज राजेंद्र लोणारे(२५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आपण बेरोजगार असून पदवीधर आहे. पातूर येथील मोहम्मद इलियास खान मोहम्मद इकबाल नामक व्यक्तीने त्याला जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागामध्ये शिक्षण सेवक पदाच्या जागा निघाल्या असल्याचे सांगून शिक्षण सेवक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्याने सात लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतरच नोकरीवर रुजू करून घेण्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार सूरज लोणारे याने पैशांची जुळवाजुळव केली. नातेवाईक, मित्रमंडळींकडून पैसे घेतले. सात लाख रुपयांची तजवीज केली आणि मोहम्मद इलियास याला पैसे दिले. काही दिवसांनंतर त्याने जिल्हा परिषद शिक्षण सेवकपदी नियुक्ती देण्यात येत असल्याचे बनावट आदेशपत्र त्याला दिले आणि ते आदेशपत्र खरे असल्याचेसुद्धा भासविले. जिल्हा परिषदेमध्ये गेल्यावर असे कोणतेच आदेशपत्र जिल्हा परिषदेने दिले नसल्याचे त्याला कळले आणि ते आदेशपत्र बनावट असल्याचे माहिती झाल्यावर आपली फसवणूक झाली, असे सूरजच्या लक्षात आले. त्याने मो. इलियासशी संपर्क साधल्यानंतर त्याला पैशांची मागणी केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर सूरजने गुरुवारी रात्री कोतवाली पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. कोतवाली पोलिसांनी आरोपी मो. इलियास याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२0, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला.
युवकाची सात लाखाने फसवणूक
By admin | Published: August 07, 2015 1:33 AM