अकोला : जिल्ह्यात कोरोनाने बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी आणखी सात जणांचा मृत्यू झाला असून, ३३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये २३१ आरटीपीसीआर, तर १०७ रॅपिड अँटीजेन चाचणीचे अहवाल आहेत. रुग्णसंख्या वाढत असली, तरी सोमवारी २७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने अकोलेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. सोमवारी आणखी सात जणांचा कोरोनाने बळी घेतला. यामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथील ६५ वर्षीय पुरूष असून त्यांना १५ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासोबतच खदान येथील ५८ वर्षीय रुग्ण, बोरगाव मंजू येथील ७० वर्षीय रुग्ण, बार्शिटाकळी तालुक्यातील महान येथील २८ वर्षीय महिला, मोठी उमरी येथील ३९ वर्षीय रुग्ण, तसेच येलवन बोरगाव मंजू येथील ६५ वर्षीय महिला, मूर्तिजापूर तालुक्यातील बोरगाव येथील ६९ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ५६७ रुग्णांचा मृत्यू झाल असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४ हजार २०१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत २८ हजार ९६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४ हजार ६७३ जणांवर उपचार सुरू आहेत.
तालुकानिहाय रुग्णांची संख्या
तालुका - रुग्णसंख्या
मूर्तिजापूर - २७
अकोट - ०९
बाळापूर - ०४
तेल्हारा - ०१
बार्शिटाकळी - १८
पातूर - १२
अकोला - १६०
(ग्रामीण - १५, मनपा क्षेत्र १४५)
रॅपिड चाचणी - १०७