अकोला : गत आठवड्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचले असून, साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक गंगा नगर भागातील एका घरात अडगळीच्या जागी चक्क सात साप आढळल्याची घटना बुधवारी, (२६ जुलै) रोजी उघडकीस आली.
गंगा नगर भागात सद्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलले आहे. या भागातील पुरवावर कुुटुंबियांच्या घरात एका पेक्षा अधिक साप असल्याचे आढळून आल्यामुळे घरातील सदस्य भयभीत झाले होते. पुरवावर यांनी तातडीने सर्पमीत्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली. बाळ काळणे यांनी घटनास्थळ गाठले तेव्हा त्यांना एका दाराजवळ सात दडून बसलेले दिसले.
त्यांनी क्षणाचाही विलंब न करता एक-एक सापाला पकडून बरणीत टाकले. हे सर्व साप नानेटी जातीचे असून, ते बिनविषारी व निरुपद्रवी असल्याचे काळणे यांनी सांगितल्यावर पुरवावर कुटुंबियांच्या जीव भांड्यात पडला. नानेटी जातीचे साप समुहाने राहतात. या सापांपेकी एखाद्याला मारले तरी त्याची भावंड त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे साप प्रतीशोध घेण्यासाठी आल्याचा गैरसमज लोकांमध्ये वाढतो. हे साप अत्यंत गरीब असून, ते बिनविषारी असतात. त्यामुळे त्यांची ओळख करून घेतल्यास भीती नष्ट होईल, असे बाळ काळणे यांनी सांगितले.