खेट्री (अकोला), दि. २३- पातूर तालुक्यातील चान्नी-सस्ती मार्गावरील सुकळी फाट्याजवळ मधमाश्यांच्या हल्ल्यात शिक्षकासह सात जण जखमी झाल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. काही शिक्षक दुचाकीने वाडेगाव-सस्ती येथून चान्नी-चतारीकडे जात होते. दरम्यान, त्यांच्यावर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये चान्नी येथील जय बजरंग विद्यालयाचे शिक्षक संजय गोपनारायण (४२) व संजय बोचरे (४६) आणि चतारी येथील जि. प. मराठी शाळेचे शिक्षक मनीष खंडारे (३५), प्रिया गजानन इंगळे (२८) व त्यांची लहान मुलगी गार्गी खंडारे (७) तसेच चान्नी येथील मजूर धम्मपाल सोनोने (३८), प्रदीप सोनोने (३६) आदी जखमी झाले. काही जखमींवर चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर प्रदीप सोनोने याला अकोला हलवण्यात आले. (वार्ताहर) दोन मजुरांनी विहिरीत घेतल्या उड्या! अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे घाबरलेले चान्नी येथील धम्मपाल सोनोने, प्रदीप सोनोने या दोघांनी जीव वाचविण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या. त्यामुळे ते एक तासापर्यंत विहिरीतच होते. या मधमाश्यांच्या धुमाकुळामुळे दोन तासापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. *उर्दू हायस्कूलच्या शिक्षकांची माणुसकी खेट्री येथील उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक शकील अहेमद खान व शिक्षक सरफराज खाँ, अ. खलील हे खेट्रीकडे जात असताना विहिरीतून ओरडण्याचा आवाज ऐकू आला. शिक्षकांनी विहिरीकडे धाव घेतली. धुपट करून विहिरीतून दोघांना सुखरूप काढले आणि स्वत:च्या चारचाकीने दोघांना चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मजुरांनी शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
मधमाशांच्या हल्ल्यात सात जण जखमी
By admin | Published: February 24, 2017 2:45 AM