- सागर कुटे
अकोला : कोरोनाचे संकट आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. अकोला विभागात अशा ७ बस विजेवर धावणार आहेत. पर्यावरणपूरक वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या निकाली निघेल. तसेच डिझेलच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे. इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या मोटरसायकल, ई-रिक्षांसोबतच आता महामंडळाच्या बसही धावणार आहेत. या बस काही महिन्यांनंतर सेवेत रुजू होतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी माहिती संकलित केली जात आहे.
या मार्गावर धावणार बस
अद्याप इलेक्ट्रिक बस प्रस्तावित आहे. अकोला-शेगाव, अकोला-बुलडाणा विभागांतर्गत मार्गावर सुरुवातीच्या काळात प्रायोगिक तत्त्वावर या बस धावतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. या बसची महामंडळातील कर्मचाऱ्यांसोबतच प्रवाशांनाही उत्सुकता लागून आहे.
आणखी सहा महिने लागणार
यासंदर्भात माहिती मागविण्यात आली असून, अकोला विभागातील ७ बसची माहिती पाठविण्यात आली आहे.
मात्र सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी या बस रस्त्यावर धावण्यास लागणार असल्याची माहिती आहे.
कारण या बसची खरेदी, त्यासाठी लागणारे चार्जिंग सेंटर याची निर्मिती करावी लागणार आहे.
कोठे होणार चार्जिंग सेंटर
या बससाठी चार्जिंग सेंटरची निर्मिती करावी लागणार आहे. सध्या ही योजना प्राथमिक स्तरावरच आहे.
त्यामुळे नेमके चार्जिंग स्टेशन कुठे राहणार याबाबत निश्चित नाही; परंतु अकोला आगारात शक्यता आहे.
त्याचप्रमाणे शेगाव येथेही चार्जिंग स्टेशन उभारण्याची शक्यता आहे. याचा फायदा अकोल्याला होईल.
खर्चात होणार बचत
विजेवर चालणाऱ्या एसटी बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर खर्चात बचत होणार आहे. सध्या बस चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च लागत आहे. या बसमुळे अडचणी कमी होतील. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होऊ शकतील. बसच्या चार्चिंगसाठी महत्त्वाच्या ठिकाणी चार्चिंग स्टेशन उभारले जाणार आहे.
सात बसच्या ४८ फेऱ्या
अकोला विभागातील अकोला आगारातून या बस सोडण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये सर्वाधिक ५ बस अकोला-शेगाव मार्गावर सोडण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. या बसच्या ४० फेऱ्या तर अकोला-बुलडाणा या मार्गावर २ बसच्या ८ फेऱ्यांचे नियोजन आहे.