अकोला : खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. तरी अद्यापही बाजार समितीत थोड्याफार प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू आहे. शनिवारी सोयाबीनला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ!
अकोला : कोरोनामुळे जिल्ह्यात पुन्हा काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमवारपासून सायंकाळी ४ नंतर बहुतांश व्यवसायांना बंदी आहे.
प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी
अकोला : अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात बाजारपेठ खुली करण्याची परवानगी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमाच्या अधीन राहून सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी हाेत आहे.
बैलजाेडी खरेदी करायची कशी?
अकोला : खरीप हंगाम सुरू झाल्याने काही शेतकऱ्यांना बैलजाेडीची नितांत आवश्यकता असते. काेराेना संक्रमणामुळे प्रशासनाने गुुरांच्या बाजारावर घातलेली बंदी अद्याप उठवली नाही. त्यामुळे बैलजाेडीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना नानाविध अडचणींना सामाेरे जावे लागत असून, गरजू शेतकऱ्यांवर बैलजाेडी विक्रेत्या शेतकऱ्यांच्या शाेधात गावाेगाव भटकण्याची वेळ ओढवली आहे.
साेयाबीन बियाणांसाठी भटकंती
अकोला : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली; परंतु अद्यापही पेरणी पूर्ण झाली नाही. बाजारात साेयाबीन बियाणांचा तुटवडा असल्याने पुन्हा पेरणी करण्यासाठी बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून बियाणांसाठी त्यांची भटकंती सुरू झाली आहे.
ऑटो चालकांचे मास्क हनुवटीवर
अकोला : कोरोनाचा संसर्ग कायम असतानादेखील काही ऑटोचालक नाका-तोंडाऐवजी मास्क हनुवटीवर ठेवत आहेत. याशिवाय काहीजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांची कारवाई व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
‘एक गाव, एक वाण’ माेहीम यशस्वी करा!
अकोला : ‘एक गाव, एक वाण’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात हरभरा पिकासाठी गावे निवडण्यात आली आहेत. उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले.
ग्रामीण भागात बसची प्रतीक्षाच!
अकोला : काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांना अजूनही बसची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागताे. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे.