अकोला : शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत उर्दू माध्यमाच्या सात शिक्षकांना पुन्हा पदस्थापना देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी दिला.
जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया २०१९ मध्ये राबविण्यात आली होती. त्यामध्ये उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत सात शिक्षकांची तेल्हारा तालुक्यात बदली करण्यात आली होती. या बदली प्रक्रियेत पती, पत्नी एकत्रीकरण व संवर्ग एक अंतर्गत अन्याय झाल्याची तक्रार करीत संबंधित सात उर्दू शिक्षकांनी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे धाव घेतली होती. उर्दू माध्यमाच्या संबंधित सात शिक्षकांची पुन्हा पदस्थापना करण्याचा आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने गत महिन्यात जिल्हा परिषद प्रशासनाला दिला होता. त्यानुसार तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत उर्दू माध्यमाच्या संबंधित सात शिक्षकांची पुन्हा पदस्थापना करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी २६ एप्रिल रोजी दिला. जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शिटाकळी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उर्दू शाळांमधील रिक्त पदांच्या ठिकाणी या सात शिक्षकांची पदस्थापना करण्यात आली आहे.