अकोला: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणात विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी दोन युवकांना सात वर्षांचा कारावास गुरूवारी सुनावला आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनअंतर्गत आरोपी आकाश गजानन राठोड व अमित गोपाळ चव्हाण दोघेही (रा. खडका, ता. जि. अकोला) यांनी अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करून असभ्य वर्तन केल्याच्या आरोपातून त्यांच्याविरुद्ध ४ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सरकारतर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी, पुराव्यांचे आधारे न्यायालयाने आरोपीना दोषी ठरविल्यानंतर भादंवि कलम ३५४ नुसार दोषी ठरवून ५ वर्ष सक्तमजुरी पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, ३५४ ‘अ’ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, ३५४ ड मध्ये ३ वर्ष सक्तमजुरी पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, ४५२ नुसार ७ वर्ष सक्तमजुरी १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद आणि ५०६ नुसार दोषी ठरवून २ वर्ष सक्तमजुरी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ७-८ मध्ये दोषी ठरवून ५ वर्ष सक्तमजुरी १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद, पॉक्सो कायदाच्या कलम ११-१२ मध्ये दोषी ठरवून ३ वर्षे सक्तमजुरी पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्रित भोगवयाच्या आहेत. (अधिकतम शिक्षा ७ वर्षे). दंडाची एकूण रक्कम ४५ हजार आरोपींकडून वसूल झाल्यास त्यापैकी अर्धी रक्कम पीडितेस व अर्धी रक्कम शासनास देण्यात यावी. असे आदेशात नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय वीणा पंडे यांनी केला, सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. हेड कॉन्स्टेबल दीपक कंडारकर व सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना ७ वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2022 10:46 AM