अकोला: जुने शहरामध्ये घडलेल्या सातपुते हत्याकांड प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात झाली असून, न्यायालयाने या हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना प्रत्येकी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली. यासोबतच आरोपींना दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे. २५ आॅक्टोबर २०१५ रोजी कैलास पांडुरंग सातपुते यांची कुºहाडीने हल्ला करून हत्या करण्यात आली होती.शिवसेना वसाहतीमधील रहिवासी कैलास पांडुरंग सातपुते आणि रवींद्र ऊर्फ विक्की जनार्दन माळी यांच्यामध्ये पूर्ववैमनस्यावरून वाद सुरू होते. याच दरम्यान २५ आॅक्टोबर २०१५ च्या रात्री दीड वाजता रवींद्र ऊर्फ विक्की जनार्दन माळी आणि विठ्ठल सुभाष काळे या दोघांनी सातपुते यांच्या घरात प्रवेश करून कैलास आणि त्याचे वडील पांडुरंग उकर्डा सातपुते यांच्यावर कुºहाडीने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. गंभीर जखमींना या परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान कैलास सातपुते यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी रवींद्र ऊर्फ विक्की जनार्दन माळी आणि विठ्ठल सुभाष काळे या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३०४, ३०२, ४४९, ३४२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात दोन आरोपींना अटक करून न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात पाठविले होते. या प्रकरणाची सुनावणी द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. जाधव यांच्या न्यायालयात झाल्यानंतर त्यांच्या न्यायालयाने १० साक्षीदार तपासले. त्यानंतर न्यायालयाला आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अन्वये सात वर्षांची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे. तर कलम ४५२ अन्वये ५ वर्षांची शिक्षा आणि ३ हजार रुपये दंड आणि कलम ३२३ अन्वये ६ महिने शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अॅड. आनंद गोदे यांनी कामकाज पाहिले.