तीन ते चार दिवसांनी पुन्हा केली जाते कोविड चाचणी
ज्या रुग्णांना कोविडचे गंभीर लक्षणे आहेत, मात्र आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आहे, असा रुग्णांना वैद्यकीय निरीक्षणात ठेवले जात आहे. उपचारानंतर तीन ते चार दिवसांच्या कालावधीत त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्यात रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला कोविड वॉर्डात संदर्भित केले जाते.
आरटीपीसीआर ७० टक्के अचुकता
आरटीपीसीआर चाचणीमध्ये रुग्णांचा थ्रॉट स्वॅब किंवा नाकातून स्वॅब घेतला जातो. त्याच्या चाचणीची अचूकता ही ७० टक्के दर्शविते, मात्र अहवाल चुकीचा येण्याची ३० टक्के शक्यता असते. त्यामुळे एखाद्या वेळेस पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांकडून अशा रुग्णांची पुन्हा कोविड चाचणी केली जाते.
‘बाल’ चाचणीत शंभर टक्के निदान
तज्ज्ञांच्या मते बाल म्हणजेच ‘बीएएल’ (ब्रांचो एल्व्हेओलर लार्ज) चाचणीद्वारे कोरोनाचे शंभर टक्के निदान शक्य आहे. या चाचणीत एका स्पोकद्वारे थेट फुफ्फुसातून नमुने संकलित करून त्याची तपासणी केली जाते. ही प्रक्रिया किचकट असून त्याचा फारसा उपयोगही केला जात नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
कोविडची गंभीर लक्षणे असूनही काही रुग्णांचे आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रुग्णांसाठी अकोला जीएमसीत स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून, त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. या रुग्णांची उपचारादरम्यान पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्यात अहवाल पॉॅझिटिव्ह आल्यास त्यांना कोविड वॉर्डात संदर्भित केले जाते.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभागप्रमुख, औषधवैद्यक शास्त्र, जीएमसी, अकोला