---------------------
वृक्षांना आगी लावण्याचे प्रकार वाढले!
पातूर : तालुक्यातील आलेगाव-पांढूर्णा या मार्गावरील दोन्ही बाजूस असलेल्या वृक्षांना रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून आगी लावण्याचे प्रकार वाढले आहे. आग लावल्यानंतर चार दिवसांत वृक्षांची विल्हेवाट लावण्यात येते.
--------------------------
‘मजुरांना शासनाने मदत द्यावी!’
बाळापूर : बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मजुरांवर कोरोना संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. गरजू व भूमिहीन मजुरांना शासनाने आर्थिक मदत किंवा पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी परिसरातील मजुरांनी केली आहे.
-----------------------------------
चतारी येथील आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात
पातूर : तालुक्यातील चतारी येथील आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले असून, अनेक पदे रिक्त आहेत. रुग्णवाहिका नाही. निवासी डॉक्टर नाही. रुग्णांची कुचंबणा होत आहे. आरोग्य विभागाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------
ढगाळ वातावरणाने कांदा संकटात
तेल्हारा : परिसरात शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी मूग, कांदा पिकाची लागवड केली आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळे पिके संकटात सापडली आहेत. शेतकरी चिंताग्रस्त असून, अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे नासाडी होण्याची शक्यता आहे.
---------------------------------------
चोहोट्टा बाजारात खरेदीसाठी झुंबड
चोहोट्टा बाजार : अत्यावश्यक खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ ही वेळ दिली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधील लोक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. बाजारपेठेत एकच झुंबड होत असल्याने कोरोना नियम पायदळी तुडविले जात आहेत.
------------------------------
पाण्यासाठी माकडांची गावांकडे धाव
बोरगावमंजू : पाण्याअभावी माकडे गावांमध्ये धाव घेत आहेत. वाडेगावसह दिग्रस, तुलंगा, सस्ती आदी गावांमध्ये माकडांनी धुमाकूळ घातला असून, माकडे नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहेत. घरांच्या छतावर चढून नुकसान करीत आहेत.