पातूर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात धरणांची संख्या असताना तालुक्यातील जांभरून येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून जमलाजवळील शेतातून पाणी आणावे लागत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
तालुक्यातील जांभरून येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील महिलांना पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी पातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांना मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन महाराज वानखेडे तसेच महिला आघाडीच्या अकोला जिल्हा अध्यक्ष ज्योती दाभाडे यांनी महिलांनासोबत लेखी निवेदन दि.१२ एप्रिल रोजी गटविकास अधिकारी ओ.टी. गाठेकर यांना निवेदन दिले होते. पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत बाबूळगावअंतर्गत येणाऱ्या जांभरून येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने महिलांना मोलमजुरी सोडून घरी राहावे लागत आहे. तसेच पाळीव गुरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करणारे निवेदन यावेळी दिले होते. मात्र, तब्बल पंधरा दिवस होऊनही महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. दोन दिवस आधी गजानन वानखडे, ज्योतीताई दाभाडे यांनी पाणीटंचाई असणाऱ्या या गावाला समस्या जाणून घेण्याकरिता भेट दिली असता या गावांमध्ये पातूर पंचायत समितीकडून पाणीटंचाईबाबत कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याची माहिती महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतीताई दाभाडे यांनी दिली. दोन दिवस आधी भेटीदरम्यान नंदा घोसले, जप्पू भगवान घोसले, शशीकला गोपालसिंग घोसले, सयाबाई सुरेश उपरवट ,पुष्पा पुरुषोत्तम शिरसाट ,पंचफुला उपरवट ,अनुसया डहाळे, सुमनबाई अनंता खर्डे आदी महिलांनी एक ते दीड किलोमीटर अंतरावर पाणी आणून त्यांची आपबिती ज्योतीताई दाभाडे यांच्याजवळ कथन केली. महिलांकडे पाण्याचे दुसरी कुठलीही व्यवस्था नसल्याने तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे. गावातील हनुमान मंदिरासमोर एक हातपंप आहे. मात्र, हातपंप नादुरुस्त असल्याने वापर होत नाही. त्यामुळे हातपंप दुरुस्ती करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे. यासंबंधी संबंधित ग्रामसेवक इंगळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. (फोटो)