कवठा : बाळापूर तालुक्यातील कवठा येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती होत असून, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
कवठा येथे जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो; मात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा ठप्प होत आहे. काही दिवसांपूर्वी महावितरणने पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित केल्याने गत पंधरा दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला होता. सद्यस्थितीतही पाणीपुरवठा ठप्प असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागरीकांना मन नदीवर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. गावात काही भागात संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, तर काही भागामध्ये दररोज पाणीपुरवठा होऊन रस्त्यावर पाणी वाहताना दिसत आहे. काही नागरिकांकडे साठवणुकीसाठी साहित्य नसल्याने पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच गावात घरकुलांची कामे सुरू आहेत. घरासाठी पाणी मिळत नसल्याने लाभार्थींना ३० रुपये प्रती २०० लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------------------------
पाण्यासाठी भटकंती
गावात काही भागात पाच ते सहा दिवसांतून पाणीपुरवठा होतो. ग्रामस्थांकडे साठवणुकीसाठी साहित्य नसल्याने गावापासून काही अंतरावर असलेल्या मन नदीपात्रातून पाणी आणावे लागत आहे. मन नदीपात्रात चार ते पाच फूट खोल खड्ड्यातून पाण्याचा उपसा करून पाणी आणावे लागत आहे.
----------------------------------------------
विकतच्या पाण्यावर तहान
कवठा परिसरात खासगी आरओ प्लांट व्यासायिकांचा धंदा जोमात सुरू आहे. गावातील काही भागात पाणी मिळत नसल्याने अशा नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र आहे. तसेच बांधकामासाठीही पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
------------------------------------
माझे घरकुलाचे काम सुरू आहे. ग्रामपंचायतीमार्फत पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. पाणी साठवणुकीसाठी साहित्य नसल्याने नदीपात्रातून बैलगाडीने पाणी आणावे लागत आहे. नाहीतर पाणी विकत घ्यावे लागते.
-यशवंत मोतीराम घ्यारे, ग्रामस्थ, कवठा.
----------------------------------------------------
कवठा येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा.
-शारदा बोरचाटे, ग्रा. पं. सदस्य, कवठा.