अकोला: युवती गोठ्यात गुरांना चारा घालण्यासाठी गेली असता, युवकाने तिच्या गतीमंद असल्याचा फायदा घेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम.श्री. गोगरकर यांनी २१ ऑक्टोबर रोजी आरोपी अंकुश मधुकर बारड(३२) रा. सस्ती, ता. पातूर याला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३ जुलै रोजी दुपारी त्यांची २८ वर्षीय मुलगी घराजवळील गोठ्यात गायीला चारा घालण्यासाठी गेला असता, आरोपी अंकुश बारड याने मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेत, तिच्यावर बळजबरी अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी देत, तिला मारहाण केली. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पीएसआय अनिता इंगळे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने आठ साथीदार तपासले. साक्षी व पुरावे ग्राह्या मानूस न्यायालयाने आरोपी अंकुश मधुकर बारड कलम ३७६ (२) (जे) (एल) अंतर्गत दोषी ठरवून १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, पाच हजार रूपये दंड, न भरल्यास अतिरिक्त ६ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भादंवि कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवून १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व एक हजार रूपये दंड, न भरल्यास अतिरिक्त ३ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भादंवि कलम ५०६ अंतर्गत दोषी ठरवुन ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा पाचशे रूपये दंड, न भरल्यास अतिरिक्त १ महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शितल दि. भुतडा यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. पो.स्टे. चान्नीचे पोलिस कर्मचारी अशोक पातोंड, यांनी सहकार्य केले.