अकोला : जुने शहरात राहणार्या एका गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी मंगळवारी उशिरा रात्री एका युवकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या १७ वर्षीय गतिमंद मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने, त्यांनी सर्वोपचार रुग्णालयामध्ये तिला उपचारासाठी घेऊन गेले. डॉक्टरांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. मुलगी गर्भवती असल्याचे ऐकल्यानंतर तिच्या पालकांना धक्काच बसला. त्यांनी परिसरात चौकशी केल्यानंतर गतिमंद मुलगी एका घरी टीव्ही पाहायला जात होती. या ठिकाणी प्रेम प्रकाश इंगळे (१९) नामक युवकसुद्धा यायचा. या युवकाने मुलीचा गैरफायदा घेत, तिचे लैंगिक शोषण केले. त्यामुळे तिला गर्भधारणा केल्याचे उघडकीस आले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी आरोपी प्रेम प्रकाश इंगळे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ व पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. प्रेमला पोलिसांनी अटक केली.
गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार! अज्ञात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल, मुलीला गर्भधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 9:46 AM