विजय शिंदे / आकोट (जि. अकोला)शहापूर बृहत या मुख्य धरणाचे बांधकाम आकोट तालुक्यातील पणज या गावाजवळून वाहणार्या स्थानिक नाल्यावर लघू पाटबंधारे योजनेंतर्गत करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी २७ फेब्रुवारी २00९ रोजी ६२ कोटी ७७ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. सदर प्रकल्प तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, प्रकल्पासाठी आवश्यक शेतजमिनीचे संपादन होण्यास अडचणी निर्माण होऊन विलंब झाला. तसेच प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त न झाल्यामुळे प्रकल्पाचे काम विहित कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकले नाही. विशेष म्हणजे भूसंपादनाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे प्रकल्पाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत या धरणाची किंमत २६१ कोटी रुपये झाली असून, प्रकल्पाचे काम सन २0१७ पर्यंत पूर्ण करावयाचे असून, अद्याप धरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे.धरणांची लांबी ५५१0 मीटर व १७.१३ मीटर उंची असून, धरणाची एकूण साठवणूक क्षमता ७.७९0 द.ल.घ.मी. आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता १३७३ हेक्टर असून, ताजनापूर, देऊळगाव, चंडिकापूर, चिंचखेड खु., सावरा, मंचनपूर, वडगाव मेंढे, वडाळी देशमुख या आठ गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामुळे कोणतेही गाव बाधित होत नाही. तसेच प्रकल्पातील 0.८८ द.ल.घ.मी. पाणी पिण्याकरिता व औद्योगिक वापराकरिता आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे. अर्धवट स्थितीत असलेल्या धरणाचे काम स्वामी सर्मथ इंजिनिअरिंगचे बी.एस. माने हे कंत्राटदार करीत आहेत. धरण पूर्ण झाल्यावर मत्स्य व्यवसाय व इतर आनुषंगिक व्यवसाय सुरू होण्यास मदत होईल. प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ११९.६७५ चौ.कि.मी. असून, पाणलोट क्षेत्र हे सातपुड्याच्या डोंगर रांगामधील आहे. चिखलदरा हे पाणलोट क्षेत्रातील प्रमुख स्थळ आहे. या भागामध्ये पडणार्या पावसाचा इतिहास पाहता प्रत्येक वर्षी हे धरण पूर्ण भरणे शक्य आहे. याचा फायदा धरणाला व प्राधान्याने सभोवतालील शेतकर्यांना नक्कीच मिळेल. परंतु, सात वर्ष उलटूनही अद्यापपर्यंत हा प्रकल्प सिंचनाकरिता फायदेशीर ठरला नाही.
भूसंपादनातील अडचणींमुळे शहापूर धरणाची गती मंदावली!
By admin | Published: June 30, 2016 1:45 AM