तेल्हारा : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये अनेक राजकीय दिग्गजांच्या ‘पॅनल’ला पराभवचा सामना करावा लागला, तर काही स्वतःही पराभूत झाले. अनेक ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी कुणा एका पॅनल स्पष्ट बहुमत दिले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी अडचणी निर्माण होणार आहेत. एकंदरीत तालुक्यात कही गम तर कही खुशी असे चित्र आहे.
तालुक्यातील हिवरखेड सर्वांत मोठी ग्रामपंचायत असून, यामध्ये कुणा एका ‘पॅनल’ला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य पती रमेश दुतोंडे यांनी सहकार क्षेत्रातील श्याम भोपळे यांचा पराभव केला. दुतोंडे यांच्या ‘पॅनल’ला पाच जागा मिळाल्या आहेत, तर प्रहार जनशक्ती पक्षाने येथे दमदार ‘एंट्री’ करून पाच जागा मिळाल्या आहेत. गिऱ्हे-भोपळे गटाला सात जागा मिळाल्या आहेत. मात्र, स्पष्ट बहुमतीसाठी कसरत करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतीभा भोजने यांच्या गावातील भांबेरी ग्रामपंचायतची निवडणूक प्रतिष्ठेची असताना भाजपचे लखन राजनकर यांनी जोरदार मुसंडी मारीत एक हाथी सत्ता काबीज करून ‘वंचित’ला धक्का दिला आहे. जि.प. अध्यक्षा प्रतिभा भोजने यांच्या ‘पॅनल’ला मतदारांनी मोठा हादरा दिला. मात्र, त्यांच्याच सर्कलमधील पंचगव्हाण येथे ‘वंचित’ने गड कायम ठेवला. बेलखेड येथे उंबरकर गोमासे गटाला शिवसेनेचे जिप सदस्य संजय अढाऊ यांनी हादरा देत मतदारांनी निमकर्डे गटाला सत्ता दिली. संजय अढाऊ यांच्या मतदारसंघातील ही निवडणूक असल्याने त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. दाणापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये कुणाला स्पष्ट बहुमत नसल्याने ‘वंचित’चे जि.प. सदस्य दामधर यांना गड कायम राखता आला नाही, तर अडगाव ग्रामपंचायतीत ‘वंचित’ची सत्ता आली नसल्याने जि.प. सदस्य कोल्हे यांची अडचण झाली आहे. तळेगाव सर्कल जि.प. सदस्य अढाव यांना गावातील शिवाजीनगरची ग्रामपंचायत वंचितच्या ताब्यात ठेवण्यात यश आले. मात्र, शिरसोली येथे त्रिशंकू सत्ता आली आहे. अडसूळ ग्रामपंचायतीत नवलकार व नागडे गटाने सत्ता कायम ठेवली आहे. घोडेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष प्रदीप ढोले पराभूत झाले असून ‘पॅनल’चा सुपडा साफ झाला आहे. इतर ग्रामपंचायतीत अनेक ठिकाणी मतदारांनी एक हाथी सत्ता दिली असून, काही ठिकाणी मिश्र सत्ता आली आहे. (फोटो घेणे)