घरकामे, शेतीची मजुरी अशी कामे करत धड बँक म्हणजे काय, हे न उमगणाऱ्या शमीम यांच्या कानावर महापालिकेच्या बचतगटाची माहिती आली. किमान दहा महिला एकत्र येऊन शंभर-शंभर रुपये गोळा केले तरी महिन्याकाठी हजार रुपये जमा होतात. नियमित सहा महिने बँकेत बचत केली तर मनपाचे राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत त्यात १० हजार रुपये फिरता निधी प्राप्त होतो. ही कल्पनाच त्यांना खूप पटली. घराजवळच्या काही महिलांना घेऊन शमीम यांनी शबनम महिला बचतगट नावाने गट सुरू केला. काही कालावधीत थोडे पैसे उचलून ठोक बाजारातून लहान मुले व महिलांचे रेडिमेड कपडे घेऊन गल्लीत विकायला सुरुवात केली. बऱ्यापैकी विक्री होत असल्याचे दिसताच बानो यांचा व्यवसाय मोबाइल व्हाॅट्सॲपवरूनही सुरू झाला. प्रतिसाद वाढल्याने त्यांनी थेट सुरतमधून कपडे खरेदीला सुरुवात केली.
महिलांना दिला रोजगार
कापडाच्या व्यवसायातून बऱ्यापैकी रक्कम जमा झाल्यावर बानो यांनी बचतगटाच्या माध्यमातून नायगाव येथील उर्दू शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम मिळवून गटातील इतर महिलांना रोजगार मिळवून दिला. पोषण आहार पुरवठ्याचा शमीम यांचा अनुभव त्यांना महिला व बाल कल्याण विभागाचे एक मोठे टेंडर मिळवून देण्याच्या कामी आला.
लाखो रुपयांच्या मशीनची खरेदी
पाच वर्षं कालावधीच्या कामापोटी शमीम बानो यांनी लाखो रुपयांच्या प्रोसेसिंग व पॅकेजिंग मशीन खरेदी केल्या आहेत. वडिलांना भार वाटणाऱ्या शमीम बानो आता संपूर्ण कुटुंबाचा आधार झाल्या आहेत. त्यांची प्रगती पाहून वस्तीत आणखी नवीन गट स्थापन झाले. आजरोजी २५ महिला बचतगटांच्या फेडरेशन असणाऱ्या उडान वस्तीस्तर संघाच्या त्या अध्यक्ष आहेत.
फोटो: