अकोला : शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्या मूल्यवर्धन शिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, यंदा अकोला महापालिकेच्या शाळांसोबत बाळापूर, मूर्तिजापूर व तेल्हारा शाळांची निवड करण्यात आली आहे. यासाठी उपरोक्त ठिकाणच्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती मुथ्था फाउंडेशनचे समन्वयक प्रा. सुभाष गादिया यांनी दिली.पातूर, बार्शीटाकळी, अकोला आणि अकोट तालुक्यात मागील वर्षांपासून मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अकोट वगळता अन्य तालुक्यात प्रशिक्षित झालेले ३८ केंद्रप्रमुख, ८० प्रेरक व ९५४ शिक्षक कार्यरत आहेत. यावर्षी बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा तालुका आणि अकोला मनपात ३२ केंद्रप्रमुख आणि ८२ प्रेरकांचे प्रशिक्षण आटोपले आहे. आता शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे.सरकारी यंत्रणा शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करते. प्रत्येक शाळेतील शिक्षक प्रशिक्षित करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. शाळांना भेटी देऊन कार्यक्रम व्यवस्थित राबविण्यात येत असल्याची खात्री करते. शांतीलाल मुथ्था फाउंडेशनने समन्वय आणि प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालुक्याला एक समन्वयक नेमला आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथून तज्ज्ञ येतात.युनेस्को, केंब्रीज विद्यापीठाकडून मान्यताभारतीय राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये बालकांवर कोवळ्या वयातच रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्यावतीने वर्ग १ ते ४ मध्ये सर्व सरकारी शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. गेल्या आठ वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू आहे. सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील पाटोडा तालुक्यातील शाळांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. युनेस्को आणि केंब्रीज विद्यापीठाने या कार्यक्रमाचे इम्पॅक्ट असेसमेंट केले असून, सर्व जगात हा कार्यक्रम राबवावा, अशी शिफारस केली आहे. याचा अभ्यासक्रम शांतीलाल मुथ्था फाउंडेशनने तयार केला असून, त्याला विद्या प्राधिकरणाने मान्यता दिली. आता हा कार्यक्रम सर्व सरकारी शाळांमध्ये सुरू आहे.