अकोला : जुने शहरातील हरिहर पेठ येथील रहिवासी एका आरोपीस तडीपार केले असतानाही तो बेकायदेशीर वास्तव्य करीत धारदार शस्त्राच्या साहाय्याने लोकांना धमकावीत असताना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने आरोपीस अटक केली. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माता मंदिराजवळ हरिहर पेठेतील गाडगेनगर येथील रहिवासी आकाश रामा निनोरे (वय २५) हा शस्त्र घेऊन लोकांना धमकावत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून आकाश निनोरे यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. आरोपीला अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले असतानाही तो बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचे उघड झाले. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.