विजय मिश्रा / शेगाव : उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असलेले वखार महामंडळाचे शेगाव येथील गोडाउन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सहा खोल्यांपैकी तीन खोल्यांमधील धान्य अन्यत्र हलविण्यात आले असून, शेतकर्यांचा नवीन मालही या गोडाउनमध्ये ठेवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ऐन खरीप हंगामाच्या दिवसात हा निर्णय घेतला गेल्यामुळे शेतकर्यांना त्यांचा माल नेमका कोठे ठेवावा, असा प्रश्न पडला आहे. वास्तविक या गोडाउनला गेल्या वर्षी अधिक उत्पन्न मिळवून दिल्याबद्दल पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता; मात्र अचानक तीन ऑगस्टपासून या गोडाउनमध्ये नवीन माल ठेवण्यास मज्जाव करण्यात आल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. गेल्या ६0 वर्षांपासून भाडेतत्त्वावर हे गोडाउन येथे आहे; मात्र आता जागा मालकाने गोडाउनसाठी चार रुपये प्रतिस्क्वेअर फूट याप्रमाणे भाडे दिल्या जावे, अशी मागणी केली आहे; पण वखार महामंडळ तीन रुपये त्यासाठी देण्यास तयार आहे. ४८ हजार स्क्वेअरफूट असलेल्या या गोडाउनमध्ये ४0.८२ मेट्रिक टन धान्य तथा उत्पादीत माल साठवला जाऊ शकतो; पण अनपेक्षित घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच उर्वरित तीन गोडाउनमधीलही माल हलविण्यासंदर्भात सूचना दिल्या गेल्या आहेत. ११ ऑक्टोबरपर्यंंत उर्वरित तीन गोडाउनही खाली करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे शेगाव तालुक्यासह लगतच्या भागातील शेतकर्यांना त्यांच्या धान्याच्या साठवणुकीसाठी मोठी अडचण होणार आहे. याकडे वखार महामंडळाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत अमरावती येथील अधिकार्याला विचारणा केली असता, हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय आहे, याबाबत आपण अधिक काही बोलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे वखार महामंडळाच्या येथील गोडाउनवरही गोडावून बंद करण्याबाबत सूचना लावण्यात आली आहे.
शेगावातील वखार महामंडळाचे गोडाउन बंद!
By admin | Published: October 07, 2015 1:53 AM