संतोषकुमार गवई
पातूर : तालुक्यातील शेकापूर येथे साधे मोबाईल नेटवर्कही नाही. अशा खेड्यातून येणाऱ्या आश्विनने उंच भरारी घेतली असून, जिद्द व परिश्रमाच्या जोरावर यूपीएससीची खडतर असलेली परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तालुक्यातील शेकापूर येथील बंजारा तांड्यातील आश्विन बाबूसिंग राठोड यांनी ५२० ही रँक मिळवत डोळे दिपवणारे यश संपादन केले आहे. तालुक्यासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
आश्विन राठोड यांच्या वडिलांचा प्रवासही प्रेरणादायी असून, त्यांनी सुद्धा पोलीस निरीक्षक पदापर्यंत झेप घेतली आहे. ते नुकतेच दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. त्यापुढील आयपीएस अधिकारी पदाचा प्रवास जणूकाही आश्विन राठोड यांनी पूर्ण केला, काहीसे असे चित्र यूपीएससी परीक्षेच्या यशामुळे निर्माण झाले आहे. आश्विन यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, भाऊ-बहीण आणि शिक्षकांना दिले आहे.
--------------------------
गावात युवकांनी सुरू केली अभ्यासिका
तालुक्यातील शेकापूर हे गाव बंजारा बहुल तांडा वस्तीचे गाव असून, तालुक्यापासून ३० किलोमीटर जिल्ह्यापासून ७५ किलोमीटर अंतरावरील गाव. शेकापूर येथे साधे मोबाईल नेटवर्कही नाही. अशा खेड्यातून शेकापूर येथील युवकांनी अनेक उच्चपदे गाठली आहेत. बाहेरगावाला नोकरी करणाऱ्या युवकांनी पुढाकार घेत गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे. पातूर तालुक्यातील युवकांनी पुढाकार घेऊन अभ्यासिका सुरू करणारे शेकापूर एकमेव गाव आहे. शिक्षणाचा ध्यास घेऊन पुढे जाण्याचे ध्येय समोर ठेवणारे शेकापूर प्रकाशझोतात आले आहे.
------------------------------------------------
शालेय शिक्षण झाले अकोल्यात!
आश्विन बाबूसिंग राठोड यांचे शालेय शिक्षण दहावीपर्यंत हे अकोला येथे पूर्ण झाले. त्यानंतर सेंट पॉल नागपूर व ग्रॅज्युएशन नागपूरच्या मोहता महाविद्यालयात पूर्ण झाले आहे. आश्विनला इयत्ता दहावीत ९४ टक्के गुण मिळाले होते. वडील पोलीस खात्यात कार्यरत असल्याने त्यांना वर्दीचे कायम आकर्षण राहले असल्याचे आश्विन राठोड यांनी सांगितले.
-------------------------------
वडील पोलीस खात्यात असल्याने नेहमीच वर्दीचे आकर्षण राहिले आहे. आई-वडील, भाऊ-बहीण व गुरुजणांचे मागर्दर्शन व सतत अभ्यास यामुळेच मी हे यश संपादन केले आहे.
-आश्विन राठोड, शेकापूर.
-------------------------------
आश्विन राठोड याने जिद्द व परिश्रमाच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून शेकापूरसह पातूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे.
-सावित्रीबाई हिरासिंग राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा, जिल्हा परिषद अकोला.
--------------
250921\img-20210925-wa0195.jpg
आश्विन राठोड