पातूर : शहरापासून जवळच असलेल्या शिर्ला येथील बुद्धभूमीवरून चौघांनी दानपेटी लंपास केल्याची घटना १६ एप्रिल रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार, शिर्ला बुद्धभूमीवर दर महिन्याच दुसऱ्या रविवारी सकाळी १० ते ५ दरम्यान लहान मुलांचे एक दिवसीय विपश्यना शिबिर असते. त्यानुसार १६ एप्रिल रोजी शिबिर आयोजित करण्यात आले होते. लहान मुले खेळत असताना दुपारी अचानक चार युवक दुचाकी क्र. एमएच ३० एएफ ३६४५ ने आले. त्यातील दोघांनी बुद्ध विहारात आत प्रवेश करून दानपेटी उचलून नेली, तर दोघे पाळत ठेवून होते. हा सर्व प्रकार शिबिरातील लहान मुलांनी पाहिला. त्यांनी आरडाओरड केल्याने चोरटे दानपेटी घेऊन पसार झाले. या चोरट्यांनी नांदखेड येथे दानपेटी फोडून त्यातील दोन ते अडीच हजार रुपये लंपास केले, तसेच दानपेटी तेथेच ठेवून पळ काढला. ही माहिती पातूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी नाकेबंदी करून चिखलगावजवळ त्यांना पकडले. याप्रकरणी पातूर पोलिसांनी अज्ञात चार युवकांविरुद्ध कलम ३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय प्रकाश झोडगे करीत आहेत.
शिर्ला बुद्धभूमीवरील दानपेटी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2017 2:07 AM