पातूर: पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत शिर्ला परिसरातील रस्त्यावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद असल्याने या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अंधाराचा फायदा घेत या भागात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी पं.स.चे माजी सभापती बालू बगाडे यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. पथदिवे सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील जीरायत पातूर, पट्टे आमराई भागातील पथदिवे बंद आहेत. या मार्गावर अनेक व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते. रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न निवेदनातून विचारण्यात आला आहे. तसेच अंधाराचा फायदा घेत या भागात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच खानापूर रस्त्यावरही अशाप्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून घाण पाणी साचत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पथदिवे तात्काळ सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना निलेश गजानन गाडगे, विलास देवकर, स्वप्निल तायडे, किरण कुमार निमकडे, महेश बोचरे, विलास धोंगडे ,पुरुषोत्तम गिऱ्हे, अजित अलाट आदी उपस्थित होते. (फोटो)
-----------------------------
माझ्याकडे प्राप्त झालेल्या निवेदनावर योग्य चौकशी करून संबंधितांना सूचनासुद्धा देण्यात येऊन तात्काळ यावर कारवाई केल्या जाईल.
-अनंत लव्हाळे, गटविकास अधिकारी, पं. स. पातूर.