पातूर: तालुक्यातील सर्वात मोठ्या शिर्ला ग्रामपंचायतने ‘प्रशासक आपल्या दारी’ अशी मोहीम गुरुवारपासून गावकऱ्यांच्या सोयीसाठी सुरू केली आहे.
गेल्या २६ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे शासनाने पातूर पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी यू.एल. घुले यांची शिर्ला ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी नियुक्ती केली.
शिर्ला ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये तीन महसुली गावे आणि पातूर नगर परिषद क्षेत्रातील नागरी भाग मोठ्या प्रमाणात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे शिर्ला ग्रामपंचायतीचे क्षेत्र १० किलोमीटर पेक्षाही मोठे झाले आहे. त्यामुळे मूळ शिर्ला गावातील आणि शिर्ला गावाला जोडलेल्या पातूर शहरी भागातील नागरिकांची ग्रामपंचायतीची निगडित कामे करून घेण्यासाठी दमछाक होते. नागरिकांना ग्रामपंचायतीशी निगडित सर्व कामे करण्यासाठी होणारा त्रास कमी व्हावा, याकरिता ग्रामपंचायत क्षेत्रातील पंचायत समितीच्या आवारात दररोज ११ ते ५ यावेळेत नागरिकांची कामे करण्यासाठी उपलब्ध राहतील. त्याबरोबरच आवश्यकता पडल्यास प्रशासक नागरिकांच्या दारी जाईल, अशी भूमिका प्रशासक घुले यांनी घेतली. गुरुवारपासून ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. पातूर तालुक्यात २३ ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये शासनाने ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे प्रशासकांची नियुक्ती केली. काही मोजके प्रशासक वगळता अनेक जण त्यांना नेमून दिलेल्या गावांना फिरकत नसल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या. अशा स्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या प्रशासकाने गावकऱ्यांसाठी सुरू केलेली मोहीम कौतुकास्पद ठरली आहे.
फोटो: