शिर्ला: पातूर तालुक्यामध्येच नव्हे तर अकोला जिल्ह्यात लक्षवेधी असलेल्या शिर्ला जिल्हा परिषद गट आणि गणात मतदारांची संख्या वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रिक्त झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांमध्ये शिर्ला ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल हाेण्याचे चिन्हे दिसत आहेत.
२०१९-२० मध्ये जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिर्ला गावातील एकूण चार हजार ८६० मतदारांचा समावेश होता. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पातुर नगर परिषदमधील क्षेत्र शिर्ला ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आले तसेच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ नुकतीच पार पडली. शिर्ला जिल्हा परिषद गट आणि गणात २५ नाेव्हेंबर २०२०ची मतदार यादी ग्राह्य धरण्याबाबत राज्य निवडणूक आयोग यांचे निर्देश स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्या आनुषंगाने शिर्ला ग्रामपंचायतीमध्ये एकूण पाच यादी भाग समाविष्ट होते. यादी भाग क्रमांक शिर्ला २३० व २३१ जिराईत पातूर, २३५ बागायत पातूर, २८५ व २८६ या यादीतील भागामध्ये चार हजार ८५२ मतदार होते. पातूर नगर परिषदमधून शिर्ला ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट झालेल्या भागातील चार हजार ७८७ मतदारांचा समावेश पातूर नागरी भागातून शिर्ला ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला. त्यामुळे शिर्ला ग्रामपंचायतमध्ये एकूण ९६३९ मतदारांचा समावेश झाला आहे.
मात्र गतवर्षी यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती, त्यावेळी शिर्ला ग्रामपंचायतीमध्ये एकूण ४८६० मतदार समाविष्ट होते. शिर्ला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार पडली होती, मात्र पातूर नागरी भागातून शिर्ला ग्रामीण ग्रामपंचायत भागांमध्ये मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद गट आणि गण या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवार आताही कामाला लागलेले आहेत, मात्र कोणता पक्ष, कोणाची उमेदवारी अधिकृत ठरवेल हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र सध्या शिर्ला जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.