अकोला : संचारबंदीच्या कालावधीत बेघर आणि रुग्णांच्या नातेवाइकांना भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग्ज ) येथे शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले .कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'लॉकडाऊन 'जाहीर करण्यात आले असून, २४ मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत बेघर आणि रुग्णांच्या नातेवाइकांना भोजनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात शिवभोजन केंद्र तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत मलकापूर येथील सावित्रीबाई फुले महिला बहुद्देशीय संस्थेच्या संचालिका शुभांगी किणगे यांना शिवभोजन केंद्र सुरू करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार जिल्हा स्त्री रुग्णालय येथे बेघर व रुग्णांच्या गरजू नातेवाइकांसाठी १० एप्रिल रोजी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू .काळे यांनी दिली.