अकोला: कोरोना महामारीच्या काळात सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीतून हजारो लोकांचे पोट भरले असले तरी, शिवभोजन वाटप करणाऱ्या केंद्रचालकांना मिळणारे अनुदान गत सहा महिन्यांपासून थकीत आहे. अनुदान मिळत नसल्याच्या स्थितीत त्यांच्यावरच उपाशी राहण्याची वेळ आली असल्याने शिवभोजन थाळी वाटपाचे थकीत अनुदान केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रचालकांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
कोरोना संकटाच्या काळात कोणीही अन्नाविना उपाशी राहू नये, यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी योजना सुरू केली. त्यामध्ये २६ जानेवारी २०२० पासून जिल्ह्यात शिवभोजन थाळी केंद्रांमार्फत गरजू व्यक्तींना पाच रुपयांत प्रती शिवभोजन थाळीचे वाटप सुरू करण्यात आले. तसेच शिवभोजन थाळीचे वाटप करणाऱ्या केंद्रचालकांना प्रती थाळी ४५ रुपयेप्रमाणे अनुदान दिले जात होते. त्यानंतर १ मे पासून शिवभोजन थाळीचे मोफत वाटप सुरू करण्यात आले असून, मोफत थाळी वाटप करणाऱ्या केंद्रचालकांना प्रती थाळी ५० रुपयेप्रमाणे अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यात १५ शिवभोजन थाळी केंद्र असून, या केंद्रांमार्फत २५ जूनपर्यंत ३ लाख २२ हजार गरजू व्यक्तींनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. परंतु शिवभोजन थाळी वाटपासाठी केंद्रचालकांना शासनाकडून मिळणारे अनुदान गत डिसेंबरपासून थकीत असल्याने, कोरोना काळात हजारो लोकांचे पोट भरणाऱ्या शिवभोजन केंद्रचालकांवर स्वत: उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी वाटपाचे थकीत अनुदान केेव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रचालकांकडून केली जात आहे.
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र
१५
आतापर्यंत किती जणांनी घेतला लाभ?
३,२२,०००
अनुदान रखडले; थाळी संख्या वाढली!
कोरोना काळात राज्य सरकारने गत १ मेपासून गरजू व्यक्तींसाठी मोफत शिवभोजन थाळी वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोफत शिवभोजन थाळींच्या संख्येत वाढ झाली आहे. गत डिसेंबरपासून शिवभाेजन थाळी केंद्रचालकांचे अनुदान रखडले असले तरी, जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रांवर मोफत थाळीसाठी रांगा लागत आहेत. त्यामुळे शिवभोजन थाळींच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोरोना काळात जिल्ह्यात १५ केंद्रांमार्फत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे. शिवभोजन थाळीचे वाटप करणाऱ्या केंद्रचालकांचे अनुदान गत डिसेंबरपासून थांबले होते. थकीत अनुदान वितरित करण्यासाठी ५२ लाख रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून, उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रचालकांचे अनुदान लवकरच वितरित करण्यात येणार आहे.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी
केंद्रचालक म्हणतात...!
गत डिसेंबरपासून शिवभोजन थाळी वाटपाचे अनुदान थकीत आहे. अनुदान मिळाले नसल्याने शिवभोजन थाळी वाटपाचा खर्च स्वत: करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने शिवभोजन थाळी केंद्रचालकांचे थकीत अनुदान तातडीने दिले पाहिजे.
- शुभांगी किनगे
शिवभोजन थाळी केंद्रचालिका, अकोला.