अकोला, दि. ३0- राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसंग्राम संघटनेला आता महापालिका निवडणुकीत भाजपसोबत भागीदारी हवी आहे. शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषदेला काही जागा देण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी भाजपकडे सोपविण्यात आला. भाजपमधील इच्छुकांची भाऊगर्दी पाहता शिवसंग्रामसाठी पक्षाकडून किती जागा सोडल्या जातात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटना उतरण्यासाठी सज्ज आहेत. राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सहभागी असलेल्या शिवसंग्राम संघटनेने आता महापालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे समोर आले आहे. शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या सूचनेनुसार मनपाच्या निवडणुकीत शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषदेच्या वतीने उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरिता भाजपच्या कोट्यातील जागा मिळवण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. त्यानुषंगाने सोमवारी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप लोड, जिल्हाध्यक्ष नानासाहेब भिसे यांनी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची भेट घेतली. महापालिकेच्या २0 प्रभागांमधून ८0 उमेदवार निवडून द्यावे लागतील. यावेळी भाजपसोबत युती करून भाजपच्या कोट्यातील काही जागांवर भारतीय संग्राम परिषदेचे उमेदवार उभे करण्याबाबत जिल्हाध्यक्ष नानासाहेब भिसे यांनी खा. संजय धोत्रे यांच्याकडे प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. भाजपमधील गर्दीचे काय ?नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पाचपैकी तीन नगरपालिकांवर भाजपाने झेंडा रोवला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडल्याचे वातावरण आहे. अशा स्थितीत मनपा निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची खच्चून गर्दी आहे. तिकिटासाठी पक्षाकडे रेटा लावून धरणार्यांची संख्या पाहता शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषदेला नेमक्या किती जागा दिल्या जातात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे. भाजपने साधली चुप्पीशिवसंग्राम संघटनेने भाजपकडे जागांचा प्रस्ताव दिला असला तरी नेमक्या कोणत्या प्रभागातील जागा संघटनेला द्यायच्या, यावर भाजपने चुप्पी साधली आहे. एका पॅनेलमध्ये चार उमेदवारांना उभे करायचे असल्याने पक्षाकडून यापूर्वीच समीकरणे बसविण्यात आली. आता ऐन वेळेवर भारतीय संग्राम परिषदेला कोणत्या जागा द्यायच्या, या मुद्यावर पक्षात खलबते सुरू झाली आहेत.
शिवसंग्रामला हवी भागीदारी; भाजपकडे दिला प्रस्ताव !
By admin | Published: January 31, 2017 2:21 AM