आशिष गावंडे
अकोला: आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेने भाजपासोबत युती जाहीर करताच जिल्ह्यात शिवसेनेने विधानसभा मतदारसंघांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघाला केंद्रस्थानी ठेवत शिवसेना जिल्ह्यातील आणखी दोन मतदारसंघांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. यामध्ये शहरी मतदारसंघावरही लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला हमीभाव आणि कोकणातील नाणार प्रकल्पावरून भाजपाची कोंडी करणाऱ्या मित्रपक्ष शिवसेनेने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत युती न झाल्यास त्याचा मोठा फटका भाजपलासुद्धा बसणार असल्याची जाणीव भाजपातील वरिष्ठ नेत्यांना झाली होती. विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीचे गठन करीत राज्यातील इतर घटक पक्षांना सामावून घेण्याच्या हालचाली पाहता भाजपा-शिवसेनेचे मनोमिलन झाले. त्या पृष्ठभूमीवर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. बाळापूर मतदारसंघात पक्षाची मजबूत मोर्चेबांधणी लक्षात घेता हा मतदारसंघ केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त शिवसेनेला आणखी दोन विधानसभा मतदारसंघ हवे आहेत. त्यामध्ये अकोट, मूर्तिजापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. कधीकाळी शिवसेनेच्या ताब्यात असलेला बोरगाव मंजू म्हणजेच आताचा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघही शिवसेनेच्या वाट्याला यावा, अशी जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची अपेक्षा असल्याचे बोलल्या जाते. जिल्ह्यातून किमान एक शहरी मतदारसंघ शिवसेनेकडे असावा, असा पक्षातील स्थानिकांचा होरा दिसून येतो. भाजपासोबत युती झाल्यामुळे लोकसभा मतदारसंघाचा विषय बाजूला सारण्यात आला असून, जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ लढण्यासाठी शिवसेना तयार असल्याचा अहवाल जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांच्याकडे सादर केल्याची माहिती आहे. विधानसभा मतदारसंघांच्या जागावाटपादरम्यान शिवसेनेच्या वाटेला किती व कोणते मतदारसंघ येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अकोटसाठी तळागाळातील शिवसैनिकांचा शोध२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती न झाल्यामुळे अकोट मतदारसंघात शिवसेना-भाजपा आमने-सामने दंड थोपटून उभे होते. त्यावेळी हा मतदारसंघ सेनेच्या हातून निसटून भाजपाकडे गेला. आज रोजी हा मतदारसंघ परत मिळविण्यासोबतच या ठिकाणी निवडणुकीसाठी निष्ठावान व तळागाळातील अशा शिवसैनिकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे. यामुळे या मतदारसंघातून निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा हिरमोड होण्याची दाट शक्यता आहे.
अकोट, मूर्तिजापूर मतदारसंघासाठी सेनेचे प्रयत्नअकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ आज रोजी भाजपाच्या ताब्यात आहेत. या व्यतिरिक्त लोकसभा मतदारसंघावरही भाजपाचा कब्जा आहे. अशा स्थितीत अकोट आणि मूर्तिजापूर मतदारसंघ सेनेच्या वाट्याला यावा, या दिशेने पक्षातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.