अकोला: उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील पीडित युवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जय हिंद चौक येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला. यावेळी वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याच्या मुद्यावरून जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश पवार व सेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले.उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील युवतीवर अमानुष अत्याचार करून तिला शेतामध्ये फेकून देण्यात आले. घटनेच्या काही दिवसांनंतर उपचारादरम्यान पीडित युवतीचा रुग्णालयात मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी पीडित युवतीचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन न करता परस्पर अंत्यविधी उरकून टाकला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींनी पीडित युवतीला गंभीररीत्या जखमी केल्याची माहिती आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी शिवसेनेचे शहर प्रमुख (पश्चिम अकोला)राजेश मिश्रा यांनी जय हिंद चौकात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. नितीन देशमुख, विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. लोकप्रतिनिधी-पोलिसांमध्ये बाचाबाचीजय हिंद चौकात पुतळा जाळल्यानंतर शिवसेनेचे लोकप्रतिनिधी वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना माहिती देत होते. यावेळी वाहतुकीची कोंडी होत असल्याची सबब पुढे करीत जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी लोकप्रतिनिधींना अटकाव केला. लोकप्रतिनिधींशी बोलताना ठाणेदार पवार यांचा पारा चढल्याने उपस्थित शिवसैनिकांनी पोलिसांच्या वर्तणुकीचा निषेध व्यक्त केला.