अकोला: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतरही राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसवर अद्यापही औरंगाबाद नावाचा उल्लेख असलेल्या पाटया झळकत आहेत. ही बाब लक्षात घेत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने मंगळवारी मध्यवर्ती बस स्थानकावर दाखल झालेल्या एसटी बसेसवर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या पाट्या लावत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव तसेच नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील असे नामकरण करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली होती. यादरम्यानच्या घडामोडीनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व त्यानंतर पावसाळी अधिवेशनात उपरोक्त दोन्ही शहरांचे पुन्हा नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.
आंदोलन करून राज्य शासनाचा केला निषेधसभागृहात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतरही राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसवर अद्यापही औरंगाबाद असाच उल्लेख असणाऱ्या पाट्या झळकत आहेत. हा प्रकार उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या लक्षात आल्यानंतर मंगळवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती बस स्थानकावर अभिनव आंदोलन करण्यात आले. बसस्थानकात दाखल झालेल्या एसटी बसेस वरील औरंगाबाद नावाची पाटी काढून त्याऐवजी छत्रपती संभाजीनगर या नावाचा उल्लेख असलेल्या पाट्या लावण्यात आल्या. आंदोलनामध्ये शहर प्रमुख राजेश मिश्रा, माजी नगरसेवक मंगेश काळे, देवीदास बोदडे, गजानन चव्हाण, शहर संघटक तरुण बगैरे, संतोष अनासने, संजय अग्रवाल, पंकज जायले, मोंटू पंजाबी, सुनील दुर्गिया, रोशन राज, रुपेश ढोरे, विकी ठाकूर, देवा गावंडे, सागर भारूका, पंकज श्रीवास आदि उपस्थित होते.
दोन एसटीच्या पाट्यांमध्ये केला बद्दलवर्धा ते औरंगाबाद बस क्रमांक एमएच ४० एक्यू-६१४२ तसेच औरंगाबाद ते नागपूर एमएच ११बीएल- ९२२७ क्रमांकाच्या बसेस वरील पाटी बदलून त्यावर छत्रपती संभाजी नगर असा उल्लेख करण्यात आला.