अकोला- शिवसेनेच्या अकोला जिल्हाप्रमुख पदासाठी उत्सुक असलेल्या नेत्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विदर्भातील शिवसेनेचे पदाधिकारी गत काही आठवड्यापासून बदलण्यात येत आहेत. अकोला जिल्ह्याच्या शेजारी जिल्ह्याच्या नवीन जिल्हाप्रमुखांची घोषणाही करण्यात आली आहे. अगदी वाशिम जिल्हाप्रमुखांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या नेत्यांच्या उत्सुकतेवर बुधवारी पाणी फेरल्या गेले. मातोश्रीवरून जिल्ह्यातील नेत्यांना तूर्तास सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईत राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अकोला जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या बदलाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या वर्षअखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार अकोल्यातूनच दिला जात असल्याने जिल्हाप्रमुखांच्या बदलाचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन नवीन जिल्हाप्रमुखाच्या नियुक्तीसाठी निवडणुकीनंतरचा मुहूर्त शोधला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीपर्यंंत शिवसेना जिल्हाप्रमुख कायम!
By admin | Published: July 10, 2015 1:26 AM