- आशिष गावंडेअकोला: येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमधील जागा वाटपावर खलबते सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. १३ व १४ सप्टेंबर रोजी विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि यंदा सर्वच राजकीय पक्षांनी युती व आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र तूर्तास दिसत आहे. शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावरून वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. ७ सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती होणारच, असे ठणकावून सांगितले होते. तथािप जागा वाटपाचे भिजत घोंगडे शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहील, हे लक्षात घेऊन शिवसेनेने इच्छुक उमेदवारांच्या तोंडी मुलाखत प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. शिवसेना भवन येथे १० सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडतील.विभागनिहाय मुलाखत प्रक्रियाविधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची तोंडी मुलाखत प्रक्रिया विभागनिहाय पार पडणार आहे. १० ते ११ सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्र, १३ ते १४ सप्टेंबर रोजी विदर्भ, १५ ते १६ सप्टेंबर रोजी मराठवाडा, १७ व १८ सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र आणि १९ व २० सप्टेंबर रोजी कोकण विभागातील उमेदवारांच्या मुलाखती होतील.