अकोला: महापौर उज्ज्वला देशमुख यांनी तयार केलेल्या माहिती पत्रिकेवर भाजप नेत्यांची प्रकाशित छायाचित्रे वगळता, मित्र पक्ष शिवसेनेच्या एकाही नेत्याला स्थान देण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. विकास कामांचे श्रेय लाटण्यावरून भाजपने नेहमीच शिवसेनेवर कुरघोडी केली. हा प्रकार यावेळी पुन्हा दिसून आल्याने सत्ताधार्यांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे. मनपात १0 सप्टेंबर २0१४ रोजी सत्तापरिवर्तन होऊन शिवसेना-भाजपने सत्तेची सूत्रे स्वीकारली. केंद्र व राज्यात युतीचे सरकार असले तरी भाजपने मंत्रिमंडळात दुय्यम दर्जाची खाती दिल्यामुळे शिवसेनेत असंतोषाचे वातावरण आहे. शिवसेनेला वेळोवेळी नामोहरम करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असून, ही धग मनपातही कायम असल्याचे चित्र आहे. १५ कोटींच्या अनुदानातून १८ रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वी सिव्हिल लाइन रस्त्याचा भूमिपूजन सोहळा घेण्यात आला होता. त्यावेळी उपमहापौर विनोद मापारी यांची प्रतीक्षा न करताच, भाजप नेत्यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून घेतला. मध्यंतरी भाजपमधील अंतर्गत वाद मिटल्यानंतर महापौर उज्ज्वला देशमुख, विजय अग्रवाल तसेच पक्षाच्या पदाधिकार्यांनी पाणीपुरवठय़ासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्तीच्या मुद्यावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये शिवसेनेला निमंत्रण नव्हते, हे येथे उल्लेखनीय. यानंतर भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेमध्ये चांगलीच खलबते झाली. युतीच्या सत्तास्थापनेला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्यामुळे महापौर उज्ज्वला देशमुख यांनी ३६५ दिवसांचा लेखाजोखा सादर केला. माहिती पत्रिकेवर भाजप नेत्यांची छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली, तर सेनेच्या एकाही नेत्याला स्थान देण्यात आले नाही. या प्रकारावर उपमहापौर विनोद मापारी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
शिवसेनेचे चुकते कोठे?
विधानसभा निवडणुकीत शिवसेना युतीसाठी अनुकूल असताना युती होऊ शकली नाही. निवडणुकीनंतर मात्र पुन्हा शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यात आली. मनपातही सत्तेचे समीकरण जुळविताना सर्वात विश्वासू मित्र म्हणून सेनेला सोबत घेतले, तर दुसरीकडे मात्र विविध मुद्यांवर सेनेला डावलण्याचे धोरण कायम असल्याने सेनेचे चुकते कोठे, असा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात निर्माण होत आहे.
विधान परिषदेसाठी भाजपची तयारी?
नोव्हेंबर महिन्यात विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक पार पडेल. भाजप-सेनेच्या पक्ष श्रेष्ठींकडून युतीबाबत कोणतेही भाष्य होत नसताना स्थानिक पातळीवर मात्र भाजपकडून रणशिंग फुंकल्या जात आहे. भाजपच्या भूमिकेमुळे शिवसैनिक द्विधा मनस्थितीत सापडले आहेत.