महाविकास आघाडीसाठी बैठक : काॅंग्रेसची गैरहजेरी, प्रहारला दाेन जागा देण्याबाबतही चर्चाअकाेला : जिल्हा परिषद व पंचायत समिती पाेटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या बॅनरवर घटक पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. या शृखंलेत बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरला. आघाडीमध्ये सेनेला सर्वाधीक जागा हव्या असून राष्ट्रवादी आपला दावा साेडायला तयार नसल्याने बुधवारची बैठक कुठल्याही निर्णयाविनाच पार पडली.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या याबैठकीला शिवसेनेचे आमदार व जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, जिल्हा परिषदेचे विराेधी पक्षनेते गाेपाल दातकर, राष्ट्रवादीचे आमदार अमाेल मिटकरी,जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे हे उपसि्थत हाेते. अकाेल्यात जिल्हा परिषदेच्या १४ जागा असून यामध्ये राष्ट्रवादीचा किमान पाच जागांवर दावा आहे तर शिवसेनेला दहा जागांची मागणी करीत आहे. काॅंग्रेसने महाविकास आघाडीत सहभागी हाेण्यास संमती दिली तर राष्ट्रवादीच्या जागा कमी करण्यावर सेनेचा भर असल्याने बुधवारच्या बैठकीत कुठल्याही निर्णय हाेऊ शकला नाही अशी माहिती सुत्रांनी दिली.
सेनेचा दहा जागांवर दावा
जिल्हा परिषदेच्या १४ जांगापैकी किमान दहा जागा लढविण्याबाबत शिवसेना आग्रही आहे. महाविकास आघाडीत काॅंग्रेस सहभागी झाल्यास दाेन्ही काॅंग्रेसने चार जागा घ्याव्यात असा प्रस्ताव सेनेने बैठकीत दिल्याची माहिती आहे त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेचा वरचष्मा राहील असा प्रयत्न सेनेकडून हाेत आहे.
शिवसेनेची स्वबळाचही तयारी २ जुलैला मुलाखती
जिल्हा परिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडी व्हावी असा प्रयत्न शिवसेनेकडून हाेत आहे दूसरीकडे अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसतील तर स्वबळाची तयारीही ठेवण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने २ जुलै राेजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे नियाेजनही सेनेने केले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिली.
तळेगाव अडगाव सर्कलचा गुंता
राष्ट्रवादी काॅंग्रेसला कुटासा, दगडपारवा, कानशिवणी हे जिल्हा परिषद सर्कल कायम ठेवून आणखी दाेन सर्कल हवे आहेत त्यामुळे तळेगाव अडगाव सर्कलचा समावेश आहे मात्र या दाेन्ही सर्कलवर शिवसेनेचाही दावा असल्याने या सर्कलबाबत बैठकीत चांगला गुंता झाला हाेता अशी माहिती आहे.